मेणवली – वाई – पाचवड रस्त्यावर दुचाकी व रुग्णवाहिकेच्या झालेल्या धडकेत दुचाकीवरील आकाश दिलीप चौधरी (वय 25, रा. मेणवली, ता. वाई) व विजय विठ्ठल पवार (रा. आरफळ, ता. जि. सातारा) या दोघांचा मृत्यू झाला. तर मयूर दिलीप चौधरी (वय 28, रा. मेणवली, ता. वाई) गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी रुग्णवाहिकेच्या चालकाविरुध्द वाई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
याबाबत पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी की, मेणवली येथील आकाश चौधरी, मयूर चौधरी हे त्यांचा मित्र विजय पवार याला सोडण्यासाठी दुचाकीवरून (एम एच 11 सीआर 9705) वाईहून पाचवडकडे निघाले होते. सायंकाळी सव्वासहाच्या सुमारास वाई- पाचवड रस्त्यावर बावधन ओढा येथील वळणावर समोरून आलेल्या भरधाव रुग्णवाहिकेने (एम एच 14 सी एल 0428) चुकीच्या बाजूला येऊन दुचाकीला जोराची धडक दिली.
अपघातानंतर रुग्णवाहिकेतून रुग्णांना जिल्हा रुग्णालयात नेण्यात आले. यावेळी डॉक्टरांनी विजय व आकाश मरण पावल्याचे सांगितले. तर मयूर गंभीर जखमी झाला असून त्याला पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. याबाबतची फिर्याद दिलीप चौधरी यांनी दिली असून अधिक तपास उपनिरीक्षक संजय मोतेकर करीत आहेत.