महाबळेश्वर – महाबळेश्वर शहर व तालुक्यात पावसाच्या सरी झेलत ढोलताशांचा गजरात “गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’च्या जयघोषात मंगलमय वातावरणात लाडक्या गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली.
महाबळेश्वर शहर तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून पावसाने पुन्हा जोर धरला आहे. रविवार प्रमाणेच सोमवारी देखील सकाळपासूनच पावसाची रिपरिप सुरुच होती. वरुणराजाच्या साक्षीने घराघरांमध्ये गणरायांचे आगमन मंगलमय, भक्तिमय व जल्लोषी वातावरणामध्ये होत होते तर दुपारी तीन वाजल्यापासून सार्वजनिक गणेश मंडळाच्या मिरवणुकांना सुरुवात झाली. मुख्य बाजारपेठेमार्गे एक एक गणेश मंडळे मार्गस्थ होत होती. संततधार पावसात देखील गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह होता.
ढोल ताशा व पारंपरिक पोशाखात अबालवृद्धांसह तरुणाई उत्साही वातावरणात लाडक्या गणरायाचे स्वागत करीत होते. सुबक, आकर्षक व उंचच उंच गणेश मूर्ती सर्वांचेच लक्ष वेधून घेत होत्या. दिवसभर पावसाची रिपरिप सुरु होती मात्र गणेशभक्तांचा उत्साह तसूभरही कमी झाला नाही. सार्वजनिक गणेश मंडळांसोबतच घरगुती गणेश मूर्तींची मोठ्या उत्साहात प्रतिष्ठापना करण्यात आली.