खेळाडूंची प्रतीक्षा संपली, 110 मार्गदर्शकांची नियुक्‍ती होणार

पुणे क्रीडा प्रबोधिनीसाठी 2 मार्गदर्शकांची होणार नियुक्‍ती : मानधनावर भरली जाणार पदे

पिंपरी – पिंपरी-चिंचवड शहर तसेच राज्यभरातून उदयोन्मुख खेळाडूंमधून राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पदक विजेते खेळाडू घडविण्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाची भूमिका पार पाडणाऱ्या क्रीडा मार्गदर्शकांची लवकरच नियुक्ती करण्यात येणार आहे. राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये 110 क्रीडा मार्गदर्शक भरण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यामध्ये पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील खेळांडूसाठी महत्वपूर्ण असणाऱ्या पुणे क्रीडा प्रबोधनीसाठीही दोन मार्गदर्शक नियुक्ती करण्यात येणार आहे. शासनाच्या या निर्णयामुळे खेळाडूंची अनेक वर्षांपासूनची प्रतीक्षा संपली आहे.

क्रीडा क्षेत्रामध्ये नेहमीच अव्वल राहणाऱ्या महाराष्ट्रात मागील अनेक वर्षांपासून क्रीडा मार्गदर्शकाची पदे रिक्त होती. तसेच, काही ठिकाणचे मार्गदर्शक हे सेवानिवृत्त अथवा प्रमोशनावर गेलेले असल्याने अनेक खेळांचे मार्गदर्शकच प्रबोधिनीमध्ये उपलब्ध नसल्याने विद्यार्थ्यांना अडचणी निर्माण झाल्या होत्या. गुणवत्ता असतानाही मार्गदर्शकांअभावी विद्यार्थ्यांची हेळसांड होत असल्याचे वारंवार समोर आले होते.

ही पदे तातडीने भरण्यात यावी अशी मागणी क्रीडा क्षेत्रातील विद्यार्थ्यांसह मान्यवरांनी लावून धरली होती. मार्गदर्शक नसल्याने त्याचा परिणाम खेळाडूंच्या कामगिरीवर तसेच अनेक स्पर्धांवरही झाला होता. ही बाब लक्षात घेऊन शासनाने मार्गदर्शकांची रिक्त पदे भरण्यासाठी नवीन जाहीर केला आहे. त्यामुळे राज्यभरात 110 मार्गदर्शकांनी निवड होण्याचा मार्ग मोकळा झाला असून हे मार्गदर्शक मानधनावर भरण्यात येणार आहेत. शासन निर्णयाचे क्रीडा क्षेत्रातून स्वागत होत आहे.

23 क्रीडा प्रकारांसाठी मार्गदर्शक असणार
मैदानी, जलतरण, सायकलिंग, हॉकी, फुटबॉल, टेबल टेनिस, बेडमिंटन, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल, हॅंडबॉल, आर्चरी, जिमन्यास्टिक, बॉक्‍सिंग, कुस्ती, वेटलिफ्टिंग, शुटिंग, ज्युदो, कबड्डी, खो-खो, तायक्वॉंनदो, मल्लखांब, तलवारबाजी व लॉनटेनिस या 23 क्रीडा प्रकारासाठी हे मार्गदर्शक असणार आहेत.

कामागिरीचे दरवर्षी मूल्यांकन
आंतरराष्ट्रीय सर्धांमध्ये पदक विजेते खेळाडू घडविण्याच्या दृष्टीने मानधन तत्वावर बाह्यस्त्रोत यंत्रणेद्वारे 25 ते 55 वयोमर्यदा असणारे क्रीडा मार्गदर्शकाची पदे भरली जाणार आहेत. मार्गदर्शकाचा कार्यकाळ 4 वर्षांचा असणार आहे. मार्गदर्शकांच्या कामगिरीचे मूल्यांकन प्रत्येक वर्षी करण्यात येणार आहे. 60 पेक्षा कमी गुणांकन असणाऱ्यांची सेवा एक वर्षानंतर समाप्त करण्यात येणार आहे.

अशी असणार संख्या
भरण्यात येणारी क्रीडा मार्गदर्शकांची पदे ही राज्यातील 8 विभागस्तरावरील मुख्यालयाच्या ठिकाणी प्रत्येकी 3 व पुणे क्रीडा प्रबोधनीसाठी 2 असे एकूण 26 मार्गदर्शक असणार आहेत. याशिवाय 28 जिल्ह्यासांठी प्रत्येकी 3 अशा एकूण 84 क्रीडा मार्गदर्शकांची नियुक्ती करण्यात येणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.