गारगुंडीतील तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

पारनेर – नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे आत्महत्या सत्र थांबण्यास तयार नाही. नगर तालुक्‍यात ऑगस्टमध्ये एकाच महिन्यात चार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना ताज्या असतानाच रविवारी सायंकाळी पारनेर तालुक्‍यातील गारगुंडी येथील नितीन प्रकाश झावरे (वय 38) या तरूण शेतकऱ्याने घरामधील पत्राच्या अँगलला फाशी घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे. त्याच्या पश्‍चात पत्नी आहे.

याबाबत माजी सरपंच अंकुश भास्कर झावरे यांनी पारनेर पोलीस ठाण्यात खबर दिली.
याबाबत माहीती अशी की, नितीन हा गावामध्येच शेती करून आपला उदरनिर्वाह करत होता.काल दिवसभर तो गावामध्येच होता. घरी आल्यानंतर पत्नी मंदिरामध्ये नैवद्य ठेवण्यासाठी गेली असता मागे परत आल्यानंतर दरवाजा वाजविल्यानंतर आतून काहीच आवाज आला नाही. नंतर परिसरातील ग्रामस्थांना बोलावून दरवाजा तोडण्यात आला. त्यानंतर घरामध्ये पत्र्याच्या एंगलला नितीन याने फाशी घेतलेली पहावयास मिळाली.

झावरे यांनी पोलिसांना ही माहीती दिली. घटनास्थळी जाऊन पोलिसांनी पंचनामा केला. मृतदेह वैद्यकीय तपासणीसाठी टाकळी ढोकेश्वर येथील रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. पठारभागात सातत्याने दुष्काळी परिस्थिती असलेल्या गारगुंडी गावात वास्तव्यास असलेले नितीन झावरे हे मागील वर्षीच्या दुष्काळ व यावर्षी वाटाण्याच्या पिकाचे झालेले नुकसान यामुळे आर्थिक अडचणीत आले असल्याचे बोलले जाते.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.