पूरग्रस्तांसाठी धावले पिंपरी-चिंचवडकर 

तहसीलच्या “हेल्प डेस्क’मध्ये ट्रक भरून संसारोपयोगी साहित्य जमा

5 वर्षांच्या चिमुकलीची मदत

पूरग्रस्तांसाठी मदतीचे आवाहन केल्यानंतर अनेकांनी आपल्या परीने मदत केली. तर तहसील कार्यालयामध्ये मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठीही काही जणांनी मदत आणून दिली. यामध्ये आरोही गोरे या 5 वर्षांच्या मुलीने तिच्या वाढदिवसाचा खर्च टाळून 2 हजार 497 रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी दिला. अवघ्या पाच वर्षांच्या मुलीने केलेल्या मदतीचे सर्वस्तरांतून कौतुक होत आहे.

पिंपरी – कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्तांसाठी योग्य पद्धतीने आणि नेमक्‍या गरजू लोकांसाठी तहसील कार्यालयाने सुरू केलेल्या “हेल्प डेस्क’ ला पिंपरी-चिंचवडकरांनी भरभरून मदत केली आहे. “हेल्प डेस्क’ साठी एक ट्रक भरून धान्य व दैनंदिन संसारोपयोगी साहित्य उपलब्ध करून दिले आहे. ही मदत तहसीलदार गीता गायकवाड, नायब तहसीलदार विकी परदेशी यांनी पुणे येथील विभागीय कार्यालयाकडे सुपूर्द केली.

पिंपरी-चिंचवड शहरात कोल्हापूर सांगली भागातील पूरग्रस्तांना मदत करण्यासाठी तहसील “हेल्प डेस्क’ सुरु करण्यात आला होता. या डेस्कच्या माध्यमातून ज्या नागरिकांना पूरग्रस्तांना मदत करायची आहे; पण वाहतूक व्यवस्था उपलब्ध नसल्याने मदत करता येत नाही, यामुळे अशा नागरिकांची मदत “हेल्प डेस्क’ च्या माध्यमातून स्वीकारण्यात येणार होती.

“हेल्प डेस्क’ ची सुरूवात झाल्यानंतर शहरातील हजारो नागरिकांनी हेल्प डेस्ककडे मदत सोपविली. यामध्ये पूरग्रस्तांसाठी अन्यधान्य, सॅनिटरी नॅपकीन, कपडे अशा जीवनावश्‍यक वस्तूंचा समावेश होता. पिंपरी-चिंचवडकरांनी जमा केलेली ही सर्व मदत पुणे येथील विभागीय आयुक्‍त कार्यालयामध्ये पोहचवण्यात आली आली आहे. तेथून ही मदत पूरग्रस्त गरजू व्यक्‍तीपर्यंत पोहचविण्यात येणार आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×