महाबळेश्वर – महाबळेश्वर शहर व परिसरातील “रस्ते खड्ड्यात’ गेले असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. महाबळेश्वर-पांचगणी मुख्य रस्त्यासह शहरांतर्गत रस्ते, महाबळेश्वर-तापोळा रस्ता, केळघर घाट रस्ता, मुख्य प्रेक्षणीय स्थळांकडे जाणारे रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. या खड्ड्यांमधून मार्ग काढताना वाहनचालकांना चांगलीच कसरत करावी लागत आहे. तर दुचाकी चालकांना आपला जीव मुठीत धरूनच प्रवास करावा लागत असून खड्ड्यात गेलेल्या रस्त्यांची तात्पुरती मलमपट्टी देखील केली जात नसल्याने स्थानिकांसह पर्यटकांतून संताप व्यक्त होत आहे.
पर्यटकांच्या हक्काचे पर्यटनस्थळ असलेल्या महाबळेश्वरमध्ये उन्हाळी, दिवाळी नाताळ हंगामाबरोबरच आता पावसाळी हंगामात देखील पर्यटक भेटी देतातच. शनिवार रविवार या “विकएंड’च्या दिवशी हजारो पर्यटक महाबळेश्वरनगरीत दाखल होतात. मात्र प्रवेश करतानाच “महाबळेश्वर’ला “चहुबाजू’ला खड्ड्यांनी वेढले आहे की काय? असा प्रश्न पडतो. कारण एकीकडे रम्य वातावरण तर दुसरीकडे “खड्ड्यात गेलेले रस्ते’ अशी परिस्थीती असल्याने पर्यटकांना या खड्ड्यांमधूनच महाबळेश्वरमध्ये प्रवेश करावा लागत असून महाबळेश्वर-पाचगणी मुख्य रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्ड्यांची जंत्रीच पहावयास मिळत असून जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे मार्ग काढताना वाहनचालकांना चांगलीच कसरत करावी लागत आहे तर दुचाकी चालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. महाबळेश्वर पांचगणी हा अंदाजे वीस किमीचा रस्त्यावरून प्रवास धक्के खातच करावा लागत आहे.
महाबळेश्वर – मेढा रस्त्यावर देखील अनेक ठिकाणी रस्त्याची चाळण झाली असून दरवर्षी या रस्त्यावर मुरूम टाकून खड्डे भरण्याचा केवळ दिखावा करण्यात येत आहे. येथील आंबेनळी, केळघर,तापोळा या तिन्हीही मुख्य रस्त्यांसह घाट रस्त्यांवर देखील जागोजागी खड्डे पडले आहेत तसेच संरक्षक कठड्यांचीही दुरवस्था झाल्याने अपघातांना निमंत्रण मिळत आहे. महाबळेश्वरचे मुख्य आकर्षण असलेल्या सर्वच प्रेक्षणीय स्थळांकडे जाणाऱ्या रस्त्यांची दैना झाली आहे. मुख्य क्षेत्र महाबळेश्वर रस्ता, ऑर्थरसीटकडे जाणारे रस्ते यासोबतच पावसाळ्यामध्ये पर्यटक हमखास भेट देतात तो मुख्य केट्स पॉईंट रस्त्यांची अवस्था तर बिकट झाली असून रस्त्याला मोठंमोठे खड्डे पडून डबकी तयार झाली आहेत.