गणपती माझा नाचत आला…

ढोल-ताशांच्या गजरात “बाप्पा’ चे स्वागत

कराड  – गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया…अशा जयघोषात, फटाक्‍यांच्या आतषबाजीत कराड शहर व परिसरात सोमवारी गणरायाचे ढोल-ताशांच्या गजरात अभूतपूर्व वातावरणात जल्लोषात स्वागत करण्यात आले. सार्वजनिक गणेश मंडळांनी मिरवणुका काढून आपल्या लाडक्‍या गणरायाची मनोभावे प्राणप्रतिष्ठापना केली. घरगुती गणेशमूर्ती घेवून जाणाऱ्या नागरिकांमध्येही प्रचंड उत्साह दिसून येत होता.

दहा दिवस चालणाऱ्या गणेशोत्सवास सोमवारपासून सुरुवात झाली. सकाळ पासूनच कराडच्या कुंभारवाड्यासह मंडई परिसर तसेच मलकापूरात मूर्ती विक्रेत्यांकडे गणेशमूर्ती घेण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. यावेळी वाहतुकीचा खोळंबा होवू नये, यासाठी ठिकठिकाणी वाहतूक पोलीस तैनात करण्यात आले होते. वाहतुक कोंडी टाळण्यासाठी वाहतुकीत तात्पुरते बदल केले होते. सार्वजनिक गणेश मंडळे ट्रॅक्‍टर, मिनी टेम्पो, जीप अशा वाहनांमधून मूर्ती मंडळाच्या मंडपाकडे घेउन जात होते.

या वाहनांमध्ये बसलेल्या कार्यकर्त्यांनी डोक्‍यावर केसरी रंगाच्या टोप्या तसेच गणपती बाप्पा मोरया अशा आशयाच्या केसरी पट्ट्या बांधल्या होत्या. घरगुती गणेशमूर्ती घेवून जाणारे नागरिक दुचाकी, चारचाकी वाहनांसह ऑटो रिक्षांचाही वापर करताना दिसत होते. सायंकाळी उशिरापर्यंत सार्वजनिक गणेश मंडळांमध्ये गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना करणे सुरुच होते. कराड शहर व परिसरात 350 हून अधिक तर कराड तालुक्‍यात 742 नोंदणीकृत सार्वजनिक गणेश मंडळे आहेत.

घरोघरी स्थापना करण्यात आलेल्या तसेच सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणेशोत्सवासाठी सजावटीचे साहित्य खरेदी करायला कराडच्या बाजारपेठेत भाविकांची मोठी गर्दी दिसत होती. न्यायालयाच्या आदेशाने थर्माकॉलवर बंदी आल्याने सजावटीसाठी स्पंज तसेच कागदाच्या लगद्यापासून तयार करण्यात आलेल्या मंदिरांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यासाठी फुलांचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात असल्याने झेंडूच्या फुलांच्या किंमतीही वाढलेल्या दिसून आले.

आपल्या लाडक्‍या बाप्पासाठी नैवेद्य म्हणून मिठाईच्या दुकानांमध्ये तयार मोदकांनाही मोठ्या प्रमाणावर मागणी होती. यावर्षी पुरामुळे काही प्रमाणात गणेशमूर्तींचे नुकसान झाले. प्रशासनाकडून डॉल्बी बंदीच्या सूचना करण्यात आल्याने गणेश आगमनाच्या मिरवणुकीत डॉल्बी ऐवजी बॅंजो, बॅंड व झांजपथकाचा वापर करण्यात आल्याचे दिसून आले. एकंदरीतच लाडक्‍या बाप्पाच्या आगमनाने भाविकांमध्ये मंगलमय वातावरण निर्माण झाले आहे.

अकरा ठिकाणी जलकुंड
गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर कराड नगरपालिकेने जय्यत तयारी केली आहे. गणेश विसर्जनासाठी अकरा जलकुंड हौद, निर्माल्य कलश शहरात विविध ठिकाणी ठेवण्यात आले आहेत. निर्माल्य संकलनाचीही सोय करण्यात आली आहे. काही ठिकाणी घरगुती मंडळाचे दीड दिवस, पाच दिवस, नऊ दिवस व बारा दिवसांनी गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात येते. त्यामुळे सर्व पाणवठ्यावर निर्माल्य संकलनाची सोय केली आहे. कृष्णा घाट, कोयनेश्‍वर घाट,कुंभार पाणवठा, गवळवेश पाणवठा, स्मशानभूमीपासून नदीकडे जाणारा मार्ग आदी ठिकाणी निर्माल्य संकलित करण्यासाठी सोय केली आहे.

मलकापूर
घरगुती गणेश मूर्ती प्रतिष्ठापनेसाठी नेताना नागरिक. तर दुसऱ्या छायाचित्रात मंगलमय वातावरणात बाप्पाला दुचाकीवरुन घरी नेताना कराडचे नागरिक.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)