चाफळ – बोडकेवाडी, ता. पाटण येथील लोकवस्तीत घुसून बिबट्याने वासरावर हल्ला करीत त्याला जागीच ठार केल्याची घटना घडली. बिबट्याच्या वारंवारच्या पाळीव जनावरांवरील हल्ल्यांमुळे शेतकऱ्यांमधून भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गत दोन महिन्यांपासून ठोमसे, बोडकेवाडी, तांबेवाडी परिसरात बिबट्याने केलेल्या हल्ल्यात आठ ते दहा शेळ्या ठार झाल्या आहेत.
दोन दिवसांपूर्वी बोडकेवाडी येथील संतोषी देसाई यांच्या राहत्या घरानजीक असलेल्या जनावरांच्या शेडमध्ये घुसून बिबट्याने वासरावर हल्ला चढवित त्याला ठार मारले. याबाबतची माहिती वनविभागाला देताच वनरक्षक रामदास घावटे, महादेव कदम, सरपंच अण्णासाहेब देसाई यांनी भेट दिली. वनविभागाने संबंधित शेतकऱ्याला नुकसान भरपाई द्यावी. अशी मागणी होत आहे.