जिल्ह्यात विघ्नहर्त्याचे उत्साहात आगमन

सातारा  – अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या श्री गणेशाचे सातारा शहर व जिल्ह्यात उत्साही आणि भक्तिपूर्ण वातावरणात आगमन झाले. गणपती बाप्पा मोरया’, मंगलमूर्ती मोरया’ असा जयघोष, ढोल-ताशांचा निनाद आणि फटाक्‍यांची आतषबाजी करत सार्वजनिक गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी आपल्या लाडक्‍या बाप्पाचे मंगलमयी वातावरणात स्वागत केले.

सर्वत्र घरगुती गणेशमूर्तींचीही दणक्‍यात प्रतिष्ठापना करण्यात आली. गणेशाबरोबरच काही ठिकाणी पावसाचेही आगमन झाल्याने आनंद द्विगुणित झाला. गणरायाच्या आगमनावेळी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ नये म्हणून जिल्ह्यात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

जिल्ह्यात सर्वत्र घरगुती गणेश-मूर्तींची उत्साहात स्थापना झाली. विविध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनीही भक्तिमय वातावरणात विघ्नहर्त्याची प्रतिष्ठापना केली. जिल्ह्याच्या पूर्व भागातील दुष्काळाचे आणि वाढत्या मंदीचे सावट गणेशोत्सवावर होते. मात्र, विघ्नहर्त्याच्या आगमनामुळे सारी संकटे दूर होतील, अशी आशा असल्याने अबालवृध्दांचा उत्साह ओसांडून वाहत होता. बाजारात खरेदीसाठी उडालेली झुंबड, हलवायाच्या दुकानात मोदक आणि लाडूसाठी लागलेल्या रांगा, रस्त्यांवर रोषणाईची जय्यत तयारी, श्रींची मूर्ती घरी नेण्यासाठी मूर्तिकारांच्या कारखान्यांमध्ये आणि स्टॉल्सवर सुरू असलेली लगबग, गर्दी आणि सळसळता उत्साह, असे वातावरणात सोमवारी गणेश चतुर्थी दिवशी होते.

शाहूनगरीचा कोपरान्कोपरा मंगलमय बनला. आसमंत ढोल-ताशांच्या निनादाने दणाणून गेला. सकाळपासूनच विविध मंडळांचे कार्यकर्ते गणरायाच्या मिरवणुकीत तल्लीन झाले होते. श्रींच्या मिरवणुकांनी शहरातील रस्ते गजबजून गेलेले दिसत होते. सार्वजनिक गणेश मंडळांनी केलेल्या रोषणाईमुळे रस्ते सायंकाळपासून उजळून निघाले होते. मंडळांचे कार्यकर्ते सजावटीवर शेवटचा हात फिरवताना दिसत होते.

मंडळांची लगबग सुरू असताना घरगुती गणेशमूर्तींसाठीही भक्तांनी गर्दी केली होती. शेकडो छोट्या सुबक गणेशमूर्ती कोणी रिक्षामधून, कोणी कारमधून तर कोणी पायी चालत गणपती बाप्पा मोरया’च्या गजरात घरी नेत होते. शाडूच्या मूर्ती लक्ष वेधून घेत होत्या. गणरायाची मनोभावे पूजा करण्यासाठी राजवाडा व मोती चौकात जास्वंद, गुलाब, केवडा, मोगरा, शेवंती, झेंडूची फुले, दुर्वा खरेदी करण्यासाठी बाजार खचाखच भरले होते. नैवैद्यासाठी लागणाऱ्या केळीच्या पानांची तडाखेबंद विक्री होत होती.

बाजारपेठेतील दुकानांमध्ये आणि ठिकठिकाणी लावलेल्या स्टॉल्सवर धूप, कापूर, अगरबत्ती, चंदन, मखर, मुकुट, कंठी घेण्यासाठी गर्दी होती. फळबाजारही तेजीत होता. सफरचंद, केळी, पपई, डाळींब, मोसंबी या फळांना मागणी वाढल्याने दर चांगलेच भडकले होते. नैवैद्याचे उकडीचे मोदक घेण्यासाठी खाद्यपदार्थांच्या दुकानां-मध्ये ग्राहकांची गर्दी होती. अशा मंगलमयी वातावरणात सातारा शहर व जिल्ह्यात श्री गणेशाची उत्साहात प्रतिष्ठापना करण्यात आली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)