गौराईला चढवला जातोय रेडिमेड साडीचा साज

बाजारपेठेत उपलब्ध विविध प्रकारच्या नऊवारी साड्यांना महिलांमधून मागणी 

कराड  – गणरायाचे सोमवारी मोठ्या उत्साहात घरोघरी आगमन झाले. येत्या दोन दिवसात गौराईचेही आगमन होत असल्याने महिला वर्गाची गौराईसाठीची तयारी सुरू झाली आहे. येथील बाजारपेठेत गौरीचे आकर्षक मुखवटे, तयार हात, पूर्णाकृती मूर्ती व दागदागिने उपलब्ध झाले आहेत. त्याबरोबरच खास गौराईसाठीच्या तयार नऊवारी साड्याही उपलब्ध झाल्या असून या तयार साड्यांचा साज यंदा घरोघरी गौराईवर चढवलेला दिसेल यात काही शंका नाही.

गेल्या काही वर्षात गौरी-गणपती उत्सवाचे स्वरूप बदलू लागले आहे. प्रत्येक जण आपल्यापरीने त्याला नावीन्याचे रूप देण्याचा प्रयत्न करत आहेत. गौरीच्या आगमनासाठी महिलांची जय्यत तयारी सुरू असते. गौरी सजावटीमध्ये महिलांमध्ये चुरस लागलेली असते. इतरांपेक्षा आपली गौरी सजावट वेगळी कशी दिसेल, यावर महिला वर्ग जास्त भर देतात. काही सामाजिक संस्थांकडून महिलांच्या या कल्पकतेला वाव देण्यासाठी गौरी-गणपती सजावट स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. याला महिलांचा चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. त्यासाठी नवीन काही शोधण्याचा त्यांचा सतत प्रयत्न सुरू असल्याचेही दिसून येते.

नऊवारी पद्धतीची साडी सणासुदीला नेसण्याची महिलांना भारी हौस असते. परंतु या साड्या नेसायला अवघड व फार वेळ लागत असल्याने गेल्या काही वर्षांपासून तयार साड्या खरेदी करण्यावर महिलांचा जास्त भर आहे.

बाजारपेठेत महिलांना हव्या तशा ब्राह्मणी, पेशवाई, लावणी, मस्तानी, शाही मस्तानी आदी प्रकारातील नऊवारी साड्या उपलब्ध आहेत. गुढीपाडवा, दसरा, दिवाळी, गौरी-गणपती या सणांमध्ये सर्रास महिला नऊवारी साड्यांनाच पसंती देतात.

आपल्या प्रमाणेच गौराईलाही नऊवारी साडी मिळावी, यासाठी महिलांची धडपड सुरू होती. काही महिला व्यावसायिकांनी या साड्या बाजारपेठेत उपलब्ध केल्या असल्याने महिलांचे काम सोपे झाले आहे. साधारण चारशे रूपयांपासून या साड्या उपलब्ध आहेत. तसेच कोणत्याही प्रकारच्या गौराईला ही साडी सहज नेसवता येते. त्यामुळे महिलांमधून या साड्यांना चांगलीच पसंती मिळू लागली आहे. त्यामुळे यंदा घरोघरी अशाच प्रकारच्या साड्या दिसतील अशी स्थिती आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.