तालुकास्तरावरील गोपनीय गुण आणि परीक्षेतील गुण एकत्र करून अंतिम निवड होणार
नगर – प्राथमिक शिक्षकांच्या कारकिर्दीत महत्त्वाचा समजला जाणाऱ्या जिल्हा शिक्षक पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर केलेल्या प्राथमिक शिक्षकांना व केंद्रप्रमुखांना उद्या मंगळवारी (दि.3) परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे. ही परीक्षा झाल्यानंतर लगेच तालुका पातळीवरून पडताळणी होऊन आलेल्या शिक्षकांचे गोपनीय गुण आणि परीक्षेत मिळालेले गुण एकत्र करून पुरस्कारासाठी शिक्षकांची नावे अंतिम करण्यात येणार आहेत.
जिल्हा परिषदेच्यावतीने 5 सप्टेंबरला प्रत्येक तालुक्यातील एका शिक्षकाला जिल्हा पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. प्रत्येक तालुक्यातील एक असे 14 शिक्षक व दोन केंद्रप्रमुख निवडण्यात येणार आहेत. यासाठी शिक्षकांना प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन यापूर्वी करण्यात आले होते. त्यानुसार प्रत्येक पंचायत समिती अंतर्गत शिक्षकांनी गटशिक्षणाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव सादर केले होते. सादर केलेल्या प्रस्तावांची छाननी करून प्रत्येक तालुक्यातून गुणवत्तेच्या आधारे पहिले तीन क्रमांक जिल्हा परिषदेकडे पाठवण्यात आले.
त्यानुसार प्रत्येक तालुक्यातील पात्र ठरलेल्या शिक्षकांचे परीक्षण जिल्हा परिषदेच्या शिक्षण अधिकाऱ्यांनी दुसऱ्या तालुक्यातील गटशिक्षण अधिकारी व केंद्रप्रमुख विस्तार अधिकारी यांच्या गटांना पाठवून परीक्षण केले. त्या परीक्षणानंतर संबंधित गटाने केलेल्या गुणदान याद्या जिल्हा परिषदेकडे गोपनीयरित्या सादर करण्यात आलेल्या आहेत. त्या शिक्षकांच्या 25 गुणांची परीक्षा मंगळवारी सकाळी साडेदहा वाजता नगर येथे होणार आहे. यासाठी जिल्ह्यातील पहिल्या फेरीत पात्र ठरलेल्या शिक्षक व केंद्रप्रमुख यांची निवड करण्यात आली आहे.
कोणत्या तालुक्यातून कोणाचे प्रस्ताव
अकोले तालुक्यातून रामनाथ हौशीराम वाकचौरे, सचिन रामदास गवांदे, विठ्ठल दगडू बांडे. संगमनेर तालुक्यातून सुशीला आबाजी धुमाळ, ज्ञानेश्वर पंढरीनाथ फटांगरे, राजेंद्र शिवराम कडलग. कोपरगाव तालुक्यातून ज्ञानेश्वर पांडुरंग सौदाणे, सुनील भिकाजी टोरपे. राहाता तालुक्यातून मुक्ताबाई नारायण शिंदे, शिवाजी पाराजी गायकवाड, कमरू निस्सा अब्बास शेख. श्रीरामपूर तालुक्यातून रमेश वारुळे, सुजित भास्कर बनकर, राजेंद्र अण्णासाहेब पंडित. राहुरी तालुक्यातून मनीषा शांताराम गायकवाड, प्रतिभा नारायण बोबे, विजय सुधाकर कदम.
नेवासा तालुक्यातील मनीषा एकनाथ लबडे, रेवन्नाथ संभाजी पवार, दत्तात्रय सखाराम शिंदे. शेवगाव तालुक्यातून रोहिणी प्रभाकर साबळे, नीतनाथ मीरा अशोक, पाथर्डी तालुक्यातून शैलेश संपतराव ढमाळ, एकनाथ कचरू बडे. जामखेड तालुक्यातून काकासाहेब अर्जुन कुमटकर, संभाजी सदाशिव कोकाटे. कर्जत तालुक्यामधून विजयकुमार रामचंद्र राऊत, श्रीमती छाया भानुदास मुन्ने, आनंदसिह चंद्रकांत परदेशी, नवनाथ रामचंद दिवटे, श्रीगोंदा तालुक्यामधून सुभाष रघुनाथ चव्हाण, ताईबाई तुकाराम पवार.
पारनेर तालुक्यामधून बाळू रेवजी शिंगोटे, मीनल उमाजी शेळके. नगर तालुक्यामधून वैजनाथ विलास धामणे, जयश्री रंगनाथ घोलप, चंद्रकला भीमराज कोतकर यांचा समावेश असणार आहे.केंद्रप्रमुख संवर्गातून संशोधन केंद्राच्या श्रीमती दिकोडा सुनंदा किशोर,शिंगवे तुकाई चे केंद्रप्रमुख अशोक घाडगे, टाकळीमानुरचे दिगंबर चव्हाण. सुप्याचे बाळासाहेब साबळे, बेलवंडी बुद्रुकचे विठ्ठल झगडे .जेऊरच्या आशा फणसे यांचा समावेश आहे.