कुरकुंभ – येथील औद्योगिक वसाहतीमधील अल्काईल अमाईन्स केमिकल कंपनीतील 14 ऑगस्टला झालेल्या भीषण आगीच्या स्फोटाबाबत कंपनीचे कार्यकारी संचालक किरात मधुसुदन पटेल यांच्या विरोधात कारखाने अधिनियम 1948 नुसार गुन्हा दाखल केला आहे, अशी माहीती औद्योगिक व आरोग्य सुरक्षा विभागाचे उपसंचालक अखिल घोगरे यांनी दिली.
अल्काईल अमाईन्स केमिकल कंपनी मधील स्टोरेज गोडाऊन दि.14 ऑगस्ट रोजी रात्री दहाच्या दरम्यान स्फोट झाल्याने कुरकुंभसह आसपासच्या परिसरातील नागरिक भयभीत झाले होते.साधारण अडीचशे ते तीनशे ड्रमच्या स्फोटाची मालिका तब्बल दोन ते तीन तास सुरू होती.
या घटनेच्या पार्श्वभूमीवर अनेक वरिष्ठांनी घटनास्थळी भेट देत येथील ग्रामस्थांशी संवाद साधला होता. अल्काईल अमाईन्स कंपनीची चौकशी होईपर्यंत कंपनी बंद ठेवणार असल्याची ग्वाही पर्यावरण व कामगार राज्यमंत्री संजय (बाळा) भेगडे यांनी कुरकुंभ आणि पांढरेवाडी ग्रामस्थांना दिली होती. आगीला कारणीभूत असलेल्या रासायनिक साठा बेकायदा पध्दतीने ठेवल्याचा व त्यामधील रसायन व्यवस्थित न हाताळल्याचा ठपका या कंपनीवर ठेवण्यात आला आहे.
कंपनीत झालेल्या स्फोटामुळे केली कारवाई
कंपनीच्या कार्यकारी संचालकावर कारखाने अधिनियम 1948 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा सिद्ध झाल्यास दोन वर्ष कारावास आणि 1 लाख रुपये दंड होऊ शकतो. भविष्यात सुरक्षिततेच्या दृष्टीने नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कुरकुंभ एमआयडीसीमधील कंपन्याची गय केली जाणार नाही. त्यांच्यावर योग्य ती कारवाई केली जाईल.
अखिल घोगरे, उपसंचालक, औद्योगिक व आरोग्य सुरक्षा विभाग, पुणे