बारामती (प्रतिनिधी): सरकारी काम सहा महिने थांब याचा प्रत्यय जवळपास सगळ्यांनीच घेतला असेल. याचबरोबर अधिकारी वेळेवर कार्यालायत दिसणे म्हणजे एक दिव्याच म्हणावे लागेल. असचा अनुभव बारामती नगरपरिषदेत रुजू झालेल्या मुख्याधिकाऱ्यांना बुधवारी (दि. 1) आला अन् त्यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना तंबी दिली. त्यामुळे एरवी 11 वाजता येणारे नगरपरिषदेतील अधिकारी, कर्मचारी गुरुवारी (दि. 2) “ऑन टाईम’ सकाळी साडेनऊ वाजता कार्यालयात उपस्थित झाल्याने नागरिकांनीही तोंडात बोटे घातली होती.
सिंघम अधिकारी म्हणून किरणराज यादव यांची ओळख आहे. यापूर्वी ते नवी मुंबई येथे उपायुक्त म्हणून काम पाहत होते. तर 2005 ते 2009 या कालावधीत त्यांनी मुख्याधिकारी म्हणून बारामती नगरपरिषदेचे कामकाज देखील पाहिले आहे.
दरम्यान, मुख्याधिकारी योगेश कडूसकर यांचा कार्यकाल पूर्ण झाल्याने त्यांची नवी मुंबई येथे यादव यांच्या जागेवर नियुक्ती झाली. तर कडूसकरांच्या जागेवर यादव यांची नियुक्ती झाली आहे. त्यांनी पहिल्याच दिवशी सुस्तावलेल्या तथा लेटलतिफांना वेळेबाबत आणि कामाबाबत कडक भाषेत सूचना केल्याने सगळ्यांचीच “दादा’गिरी फूस झाली आहे.
किरणराज यादव यांनी बुधवारी विविध विभागांच्या कामकाजाचा आढावा त्यांनी अधिकाऱ्यांकडून घेत कामकाजाला सुरुवात केली. त्यावेळी त्यांनी वेळेची शिस्त व कामकाजाच्या पद्धतीबाबत अधिकाऱ्यांना सूचना केल्या.
तर मुख्याधिकारी यादव स्वतः सकाळी साडेनऊ वाजता कार्यालयात येत असल्याने इतर अधिकारी देखील कार्यालयात वेळेवर हजर होत आहेत. मुख्याधिकाऱ्यांच्या शिस्तबद्ध कामकाजामुळे इतर अधिकाऱ्यांच्या बेशिस्त कामकाजाला नक्कीच चाप बसेल असा विश्वास नागरिकांना आहे.