मुंबई – गानसाम्राज्ञी लता मंगेशकर यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळते आहे. त्यांच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होत आहे. अशी माहिती मंगेशकर कुटुंबीयातील सदस्यांनी दिली. गेल्या काही दिवसांपासून लतादीदींना लिक्विड डाएटवर ठेवण्यात आलं होतं. आज त्यांनी जेवण केलं असंही त्यांच्या कुटुंबीयातील सदस्याने सांगितले.
दरम्यान, त्यांची प्रकृती पूर्ण ठणठणीत होण्यास आणखी काही अवधी लागेल असे देखील सांगल्यात आले. एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीने यासंदर्भातले वृत्त दिलं आहे.
90 वर्षीय लतादीदींना सोमवारी पहाटे श्वास घेताना त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांना तातडीने ब्रीच कॅंडी रूग्णालयात दाखल करण्यात आले. छातीत संसर्ग झाला असल्याने त्यांना उपचारासाठी अतिदक्षता विभागात (आयसीयू) हलवण्यात आले. डॉ. फारुख उद्वारिया यांच्या देखरेखीखाली लता मंगेशकर यांच्यावर उपचार करण्यात येत आहे.
भारतीय चित्रपटसृष्टीतील महान पार्श्वगायिका असणाऱ्या लतादीदींनी विविध भाषांमध्ये 30 हजारहून अधिक गाणी गायली आहेत. त्यांना 2001 मध्ये भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. 2004 मध्ये त्यांनी यश चोप्रा दिग्दर्शित विरझारा या चित्रपटासाठी शेवटचे पार्श्वगायन केले होते.