मुंबई – विख्यात पार्श्वगायिका लता मंगेशकर यांचे निवासस्थान असलेली प्रभुकुंज ही इमारत बृहन्मुंबई महापालिकेने कोविड-19 च्या साथीच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून शनिवारी सील केली. लता मंगेशकर आणि त्यांचे कुटुंबीय सुरक्षित असल्याचे मंगेशकर कुटुंबीयांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनामध्ये स्पष्ट करण्यात आले आहे.
‘आमच्या आरोग्याबाबत कोणतीही तात्काळ प्रतिक्रिया देऊ नये. आम्ही सारे जण एकत्र आणि सुखरूप आहोत. आम्ही आमची खूप चांगली काळजी घेत आहोत. आमच्यातील ज्येष्ठांची आणि कुटुंबातील अन्य सदस्यांचीही आम्ही चांगली काळजी घेत आहोत आणि एकमेकांना सहकार्यही करत आहोत. देवाच्या कृपेमुळे आम्ही सर्व कुटुंबीय सुरक्षित आहोत.’ असे या निवेदनामध्ये म्हटले आहे.
प्रभुकुंज इमारत सील करण्यात आली आहे, हे विचारण्यासाठी दररोज खूप फोन येत आहेत. आमच्या घरामध्ये ज्येष्ठ नागरिक असल्यामुळे सोसायटी आणि प्रभुकुंज इमारत बीएमसीने सील केली आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर काळजी घेणे अपरिहार्य आहे.
नेहमी उत्साहाने साजरा होणारा गणेशोत्सवही आपण साधेपणाने साजरा केला जात आहे. त्यामुळे सर्वांनी सहकार्य करावे आणि सोशल डिस्टन्सिंग पाळण्यासाठी मदत करावी, असे आवाहनही मंगेशकर कुटुंबीयांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.