मुंबई – देशाच्या स्वर कोकिळा लता मंगेशकर यांनी काल जगाचा निरोप घेतला. मंगेशकर यांना अंतिम निरोप देण्यासाठी सर्व बड्या नेत्यांसह चित्रपट जगतातील दिग्गज अभिनेते आणि अभिनेत्रीही पोहोचल्या होत्या. यादरम्यान शाहरुख खान त्याची मॅनेजर पूजा ददलानीसोबत पोहोचला आणि लता मंगेशकर यांना श्रद्धांजली वाहिली. पण सोशल मीडियावर लोकांनी शाहरुख खानला ट्रोल करायला सुरुवात केली. आता शिवसेना खासदार सजय राऊत यांनी शाहरुख खानला ट्रोल करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे.
लता मंगेशकर यांचे पार्थिव शिवाजी पार्कमध्ये अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले होते. यावेळी बॉलिवूडचा दिग्गज अभिनेता शाहरुख खानही लता मंगेशकर यांना निरोप देण्यासाठी पोहोचला. यादरम्यान शाहरुख खानने इस्लामिक रीतिरिवाजातून लता मंगेशकर यांच्यासाठी दुआ वाचली त्यानंतर दुआ पठण केल्यानंतर लता मंगेशकर यांच्या पायाजवळ शाहरुखने फुंकर मारली. जी दुआनंतरची प्रथा आहे. मात्र शाहरूखची ही कृती सध्या सोशल नेटवर्किंगवर प्रचंड चर्चेत असून काहींनी शाहरुख लतादीदींच्या पार्थिवावर थुंकल्याचा दावा केला आहे. या दाव्यामुळे सोशल मीडियावर मोठा वाद निर्माण झाला. अनेकांनी शाहरुखवर टीका केली.
यानंतर शाहरुख मंगेशकर यांच्या पाया पडला. मात्र शाहरुखने लता मंगेशकर यांच्या पायावर थुंकल्याची अफवा सोशल मीडियावर पसरली. यानंतर लोकांनी काहीही विचार न करता त्यास ट्रोल करायला सुरुवात केली आणि त्यांच्या विरोधात भाषणबाजीही सुरू केली. असे असले तरी शाहरुखला पाठिंबा देण्यासाठी अनेक जण उभेही राहिले आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शाहरुख खानचे समर्थन करताना ट्रोल करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. ज्या पद्धतीने शाहरुखला ट्रोल केले जात आहे तो नालायकपणा, बेशमरपणा आहे, अशा लोकांना लाज वाटत नाही. कोण अशा प्रसंगी महान अभिनेत्याला ट्रोल करत आहे. हे निर्लज्ज लोक आहेत, जे अशावेळीही धर्म, जात यांचा राजकारणासाठी आधार घेतात. मी याची निंदा करतो. तुम्ही लताजींनाही सोडलं नाही. अशा शब्दात राऊत यांनी ट्रोलर्सचा समाचार घेतला आहे.