नवी दिल्ली -भारतीय संघाने विश्वचषक स्पर्धेत दमदार कामगिरी करत उपांत्य फेरी गाठली. मात्र, उपांत्य फेरीत भारतीय संघाला न्यूझीलंडकडून पराभवाचा सामना करावा लागल्याने भारतीय संघाचे आव्हान संपुष्टात आले. त्यानंतर भारतीय संघाचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक फलंदाज महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीच्या चर्चा सध्या सुरू असून न्यूझीलंड संघाकडून झालेल्या पराभवानंतर याची चर्चा आणखीनच रंगू लागली आहे. त्यातच गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी धोनीला तू निवृत्तीचा विचार करू नकोस, असा सल्ला दिला आहे.
ट्विटरच्या माध्यमातून लता मंगेशकर यांनी हा सल्ला दिला आहे. लता मंगेशकर यांनी केलेल्या ट्विटमध्ये त्या म्हणाल्या आहेत की, नमस्कार एम एस धोनी. तुम्हाला निवृत्ती घ्यायची आहे असे माझ्या कानावर आले आहे. कृपया तुम्ही असा विचार करू नका. देशाला तुमच्या खेळाची गरज आहे. निवृत्तीचा विचारही तुम्ही मनात आणू नका अशी माझी विनंती आहे.