#महिला_दिन_विशेष : लता भाटीयांचे प्रयत्न कचरामुक्त जीवनशैलीच्या दिशेने

शून्य कचरा निर्मितीला देतात प्रोत्साहन

कचरामुक्त आयुष्य जगणं जवळपास अशक्य आहे, असंच आपल्याला वाटतं. हे आयुष्य जगण्यासाठी तीव्र इच्छाशक्ती, त्याग आणि सातत्याची गरज असते. पण कोलकात्याच्या लता भाटिया गेल्या पाच वर्षांपासून कचरामुक्त आयुष्य जगत आहेत. त्यांनी आपल्या कृतीतून समाजापुढे आदर्श उभा केला आहे. लता यांना कचरामुक्त आयुष्य ही संकल्पना कोलकात्यासह संपूर्ण भारतभरात लोकप्रिय करायची आहे. यानिमित्ताने त्यांनी पर्यावरण रक्षणाचा वसाच घेतला आहे.

लता भाटिया 57 वर्षांच्या आहेत. गेल्या पाच वर्षांपासून त्या कचरामुक्त आयुष्य जगत आहेत. कोलकाता हे प्रचंड लोकसंख्या असलेलं शहर. इथे कचरा व्यवस्थापनाचा पुरता बोजवारा उडाला आहे. कोलकात्यातल्या या चुकीच्या कचरा व्यवस्थापनाच्या बातम्या सतत चर्चेत असतात. कोलकाता हे शहर गेल्या दशकभरापासून या समस्येने त्रस्त आहे. या शहरात प्रदूषणाचं प्रमाणही बरंच जास्त आहे. काही सेवाभावी संस्था तसंच व्यक्तींनी कचरा व्यवस्थापनासाठी कार्य केलं.

कोलकात्यातल्या कचर्‍याचं प्रचंड प्रमाण बघता हे प्रयत्न थिटे पडतात असंच म्हणावं लागेल. लता भाटिया यांनी नुकतंच झीरो वेस्ट स्टोअर सुरू केलं आहे. त्यांचं हे दुकान आता बरंच लोकप्रिय होत आहे. लता यांच्या उपक्रमामुळे पर्यावरणपूरक, टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ, सेंद्रिय वस्तू एकाच छताखाली मिळू लागल्या आहेत. याच कारणामुळे लोकांना भल्यामोठ्या सुपरमार्केटपेक्षा त्यांचं हे छोटेखानी पण पर्यावरणपूरक दुकान आपलंसं वाटू लागलं आहे.

आपल्या या उपक्रमाबद्दल आणि कचरामुक्त आयुष्याबद्दल त्या सांगतात, कोलकात्यात नजर जाईल तिथे कचरा दिसायचा. सगळीकडे पसरलेली घाण, उघड्यावर होणारं मलमूत्र विसर्जन या सगळ्यामुळे मी काळजीत पडले. या घाणीचा, कचर्‍याचा त्रास स्थानिकांना तर होतोच शिवाय पर्यावरणाची अपरिमित हानीही होते. ही समस्या सोडवण्यासाठी आपणच प्रयत्न करायला हवेत, याची जाणीव मला झाली आणि कचरामुक्त आयुष्य जगण्याच्या दिशेने पहिलं पाऊल टाकलं.

लता यांनी 2016 मध्ये कचरा व्यवस्थापनाच्या क्षेत्रात पाऊल टाकलं. त्यांनी शाश्‍वत जीवनशैलीचा अवलंब करायला सुरूवात केली. या दिशेने पहिलं पाऊल टाकताना त्यांनी घरच्या घरी खत बनवायला सुरूवात केली. घरीच खत बनवायला सुरूवात केल्यानंतर त्यांनी इतरांनाही अशाच पद्धतीने खत तयार करण्यासाठी प्रवृत्त केलं. शेजारीपाजारी, नातेवाईकांना त्यांनी याचं महत्त्व समजावून सांगितलं. हे अगदी छोटंसं पाऊल असलं तरी शहरावरचा कचर्‍याचा ताण कमी करण्याच्या दृष्टीने हे पाऊलही महत्त्वाचंच होतं.

कचरामुक्तीचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी ग्रीन लिगन या नावाची संस्थाही सुरू केली. मग झीरो वेस्ट बाजार हे दुकानही सुरू केलं. या दुकानात किराणा सामान, रोजच्या गरजेच्या वस्तू तसंच इतर वस्तू मिळतात. त्यांच्या दुकानात प्लास्टिकची वस्तू मिळत नाही. महिन्याभरातच हे दुकान खूप लोकप्रिय झालं आहे. लता भाटिया यांना कचरामुक्त जीवनशैली लोकांच्या अंगी भिनवायची आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.