अखेर जिल्हा रूग्णालयात इंदुरीकर महाराजांचा खुलासा

नगर  – गेल्या आठ दिवसांपासून हभप इंदुरीकर महाराज यांनी केलेल्या वक्तव्य संदर्भात विषय राज्यात चांगलाच गाजला गेला.आज इंदुरीकर महाराज यांच्या वकिलांनी तसेच सेवकांनी नगर येथे जिल्हा रुग्णालयामध्ये येऊन गुपचूप खुलासा सादर केला आहे.

दरम्यान या संदर्भामध्ये जिल्हा रुग्णालयाच्या वतीने बोलण्यास नकार दिला आहे तर संबंधित वकिलांनी दोन दिवसांनंतर आम्ही आमची भूमिका स्पष्ट करू असे त्यांनी सांगितले. गेल्या आठवडाभरापासून हभप इंदुरीकर महाराज यांनी केलेल्या वक्तव्याचे चांगलेच पडसाद राज्यभर उमटले आहे. त्यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल अनेक सामाजिक संघटनांनी आक्षेप घेतलेला आहे.

तसेच दोन दिवसांपूर्वी इंदुरीकर महाराज यांनी आपण केलेल्या वक्तव्याबद्दल जर कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर मी जाहीरपणे माफी मागतो असे लेखी पत्र काढले होते. तत्पूर्वी हे प्रकरण होत असतानाच दुसरीकडे नगरचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्‍टर प्रवीण मुरंबीकर यांनी इंदुरीकर महाराज यांना नोटीस बजावून खुलासा करावा असे म्हणले होते.या नोटिशीचा खुलासा करण्याचा आज शेवटचा दिवस होता आज सुट्टी असल्यामुळे खुलासा येतो की नाही याकडे सगळ्यांचे लक्ष लागले होते.

इंदुरकर महाराजांचे वकील शिवडीकर हे एका सेवका समवेत आज दुपारच्या सुमारास जिल्हा रुग्णालयांमध्ये दाखल झाले.या ठिकाणी प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी आले असता त्यांनी त्या ठिकाणी सुरुवातीला पळ काढला मात्र आज कोणत्याही परिस्थितीमध्ये खुलासा सादर करायचा असल्यामुळे त्यांनी तेथील अधिकाऱ्यांची फोनवरून संपर्क केला व त्या ठिकाणी असलेल्या डॉक्‍टरांकडे तुम्ही खुलासा सादर करा असे सांगितले. त्यानंतर अपघात कक्ष विभागांमध्ये कार्यरत असलेल्या डॉक्‍टरांकडे त्यांनी खुलासा सादर केला व दोन दिवसांत भूमिका जाहीर करू असे सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.