खटाव (प्रतिनिधी) – खटावचे सुपुत्र जवान अमित पोळ यांचे दिल्ली येथे हृदय विकाराने निधन झाले होते. बुधवारी त्यांच्या मुळ गावी खटाव येथे लष्करी इतमामात जवान अमित पोळ यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.
खटाव (ता. खटाव) येथील सिमा सुरक्षा दलाचे जवान अमित पोळ यांचे दिल्ली येथे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले होते. त्यांचे पार्थिव दिल्ली येथून विमानाने पुणे येथे आणण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्या मुळ गावी खटाव येथे दिल्ली येथील बीएसएफच्या निवडक जवानांच्या लवाजम्यासह दाखल झाले. खटाव येथे पार्थिव येताच जवान अमित पोळ कुटुंबीयांच्या अश्रूंचा बांध फुटला.
यावेळी खटावमधील ग्रामस्थांनी मास्क, सॅनिटायझर व सोशल डिस्टन्स ठेऊन पार्थिवाचे अंतिम दर्शन घेतले.
सध्या जिल्ह्यात वाढत असलेला करोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता ग्रामस्थांनीही गर्दी न करता प्रशासनाच्या नियमांचा आदर ठेवला. तसेच गर्दी न करता फुलांनी सजवलेल्या वाहनातून जवान अमित पोळ यांच्या पार्थिवाची अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी ठराविक लोकांकरवी वीर जवान तुझे सलाम, भारत माता की जय, अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी आ. महेश शिंदे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रदिप विधाते, राहूल पाटील, सरपंच नंदकुमार वायदंडे, उपसरपंच अमर देशमुख यांनी श्रद्धांजली अर्पण केली.
बीएसएफ जवानांनी लष्करी इतमामात आपल्या बंदुकीतून तीन फैरी झाडून जवान अमित पोळ यांना मानवंदना दिली व पार्थिवा सोबत असणार तिरंगा त्यांच्या नातेवाईकांकडे सुपूर्द केला. यानंतर जवान अमित यांच्या पार्थिवास मुखाग्नी देण्यात आला. यावेळी पुसेगाव पोलीस स्टेशनचे सपोनि विश्वजीत घोडके यांनी करोना विषाणूचा फैलावा होऊ नये म्हणून चोख बंदोबस्त ठेवला होता.