श्रीनगर – जम्मू काश्मीरमध्ये काल रात्री झालेल्या एका चकमकीमध्ये सुरक्षा दलांनी लष्कर ए तोयबाच्या तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. या चकमकीमध्ये पोलीस उपनिरीक्षक शहीद झाला.
दहशतवाद्यांनी श्रीनगरच्या जवळ पांथा चौक भागातील पोलीस आणि केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या एका नाक्यावर गोळीबार केला. त्यानंतर या चकमकीला सुरुवात झाली होती. हे दहशतवादी मोटरसायकलवरून आले होते आणि सुरक्षा चौकीवर गोळीबार केल्यानंतर पळून जाताना त्यांनी जवळच्या धोबी मोहल्ला भागात आश्रय घेतला.
सुरक्षा दलांनी या परिसराची नाकाबंदी करून शोधमोहिमेला सुरुवात केली होती. रात्रभर या परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला. आज सकाळी पुन्हा गोळीबाराला सुरुवात झाली. जम्मू काश्मीर पोलीस दलाचे उपनिरीक्षक बाबू राम हे या कारवाईदरम्यान शहीद झाले असल्याचे जम्मू काश्मीर पोलीस महासंचालक दिलबाग सिंग यांनी सांगितले.
ठार झालेल्या दहशतवाद्यांमध्ये एक जण लष्कर ए तोयबाचा कमांडर होता आणि तो गेल्या दीड वर्षापासून सक्रिय होता. इतर दोघाजणांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.