– गायत्री वाजपेयी
पुणे – शत्रूच्या रणगाड्याचा अचूक वेध घेत, तो उद्ध्वस्त करणारे लेझर गायडेड ऍण्टी टॅंक मिसाइल म्हणजेच रणगाडा भेदी क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी अहमदनगर येथे करण्यात आली. या क्षेपणास्त्राची निर्मिती पुण्यातील एआरडीई आणि एचईएमआरएल या डीआरडीओच्या प्रयोगशाळांमध्ये करण्यात आली आहे.
संरक्षण दलातर्फे हे एक महत्त्वाचे संशोधन मानले जाते. विशेष म्हणजे या क्षेपणास्त्राची रचना, निर्मिती, तंत्रज्ञान आणि त्यामध्ये आवश्यक असलेला दारूगोळा हा पुण्यात निर्माण करण्यात आला आहे. डीआरडीओच्या पुण्यातील प्रयोगशाळा असलेल्या आरमामेन्ट रिसर्च ऍण्ड डेव्हलपमेंट इस्टाब्लिशमेंट (एआरडीई) आणि हाय एनर्जी मटेरिअल रिसर्च लॅबरेटरी (एचईएमआरएल) या दोन प्रयोगशाळांमध्ये या क्षेपणास्त्रासंबंधीचे काम करण्यात आले.
मिसाईलची रचना, त्यासाठी आवश्यक असणारे तंत्रज्ञान विकसित करणे तसेच मिसाईल सोडण्यासाठी आवश्यक असलेली लॉन्चिंग यंत्रणा एआरडीई या संस्थेत निर्माण करण्यात आली आहे. तर या मिसाईलमध्ये आवश्यक असणारा दारूगोळा तसेच विविध तांत्रिक गोष्टींची निर्मिती एचईएमआरएल या प्रयोगशाळेत करण्यात आली आहे, अशी माहिती डीआरडीओच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
असे काम करते लेझर गायडेड मिसाइल
रणगाडाभेदी लेझर गायडेड मिसाइलमध्ये असलेल्या यंत्रणेद्वारे शत्रूच्या रणगाड्यांची प्रतिमा तयार करून त्यावर लक्ष्य साधले जाते. त्या रणगाड्याच्या सभोवताली लेझरद्वारे एक कवच तयार केले जाते. या कवचामध्ये तयार झालेल्या प्रतिमेच्या माध्यमातून शत्रूच्या रणगाड्यांचा निशाणा साधत, तो पूर्णपणे उद्ध्वस्त केला जातो.