नवी दिल्ली – करोना निधीला मदत करण्यासाठी आता उद्योग क्षेत्रातील अनेक कंपन्या पुढे येत असून लार्सन टुब्रो कंपनीने आज त्यासाठी दीडशे कोटी रुपयांचा निधी जाहीर केला आहे. त्या खेरीज कंपनीने आपल्या कंत्राटी कामगारांना मदत करण्यासाठी दर महा पाचशे कोटी रुपये बाजूला काढून ठेवण्याचाही निर्णय घेतला आहे. या कंपनीत सुमारे 1 लाख 60 हजार कंत्राटी कामगार काम करीत आहेत. या कामगारांना लॉकडाऊन काळासाठी आर्थिक मदत, त्यांच्या राहण्याजेवण्याची सोय यासाठी हा पैसा वापरला जाणार आहे.
त्यांनी पंतप्रधान निधीसाठी हे दीडशे कोटी रुपये घोषित केले आहेत. या कंपनीचे अध्यक्ष ए. एम. नाईक यांनी सांगितले की, आम्ही करोनाच्या संबंधात अनेक उपाययोजना करीत असून आम्ही आमच्या प्रशिक्षण वर्गांचे रूपांतरही आयसोलेशन सेंटर्ससाठी करण्याचे ठरवले आहे. या खेरीज कंपनीतर्फे वाहन सेवा, ऍम्ब्युलन्स सेवा आणि वैद्यकीय उपचार सेवाही देण्यात येत आहेत असे त्यांनी म्हटले आहे. कंपनीने सर्व मोठ्या शहरांमध्ये कोविद -19 रिस्पॉन्स पथकेही तयार केली आहेत.
शनिवारी टाटाग्रुपने करोना आपत्तीसाठी 1500 कोटी रुपयांची मदत घोषित केली असून जेएसडब्ल्यु समूहाने शंभर कोटी रुपये पंतप्रधान निधीसाठी जाहीर केले आहेत. अडानी ग्रुपचे गौतम अडानी यांनीही पंतप्रधान निधीसाठी शंभर कोटी रुपयांची मदत घोषित केली आहे. रिलायन्स उद्योग समूहाने प्राथमिक मदत म्हणून पाच कोटी रुपये जाहीर केले आहेत.