ट्रक बंद पडल्याने पुणे-नाशिक महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी

राजगुरूनगर (प्रतिनिधी): राजगुरूनगर येथे खेड घाटात आज (दि.२४) पहाटे २ वाजता ट्रक बंद पडल्याने खेड घाटासह महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली. तब्बल १२ ते १४ तास महामार्गावर वाहतूक कोंडी झाल्याने प्रवाश्यांचे मोठे हाल झाले.

सलग आलेल्या सुट्ट्या आणि संजीवन सोहळा व कार्तिकी एकादशी साठी माउलींच्या दर्शनासाठी गेलेले भाविक, आज या महामार्गाने परतीच्या प्रवासात असल्याने महामार्गावर वाहनांची मोठी गर्दी झाली होती. वाहनांची संख्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात असल्याने आणि त्यातच घाटाच्या पहिल्याच वळणावर एक ट्रक बंद पडल्याने मोठी वाहतूक कोंडी झाली.

दरम्यान, ही वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पोलीस आणि प्रवास करणाऱ्या नागरिकांना तारेवरची कसरत करावी लागली. त्यात वाहन चालकांचा अतिखाई पणा वाहतूक कोंडीला आणखीच कारणीभूत ठरत होता. वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवत नागरिक रस्त्यावर दुचाकी, चारचाकी गाड्या बिनधास्तपणे चालवतात यामुळे वाहतूक कोंडी होते.

देशातील सर्वाधिक वाहतूक कोंडीचा महामार्ग म्हणून पुणे नाशिक महामार्गाकडे पाहिले जात आहे. या महामार्गावर मोठ्या प्रमाणात जड अवजड वाहनांची मोठी गर्दी आहे. त्यातच पावसामुळे खड्डे पडले असून रस्त्यावरील खड्डे भरले मात्र रस्त्याच्या कडेचे साईडपट्टे तसेच असल्याने हा महामार्ग मृत्यूचा साफळा बनला आहे. तसेच राजगुरूनगर जवळील अरुंद रस्ता खेड घाटाची नागमोडी अरुंद रस्त्याची वळणे वाहतूक कोंडीला निमंत्रित करीत आहेत.

आज मध्यरात्री २ वाजण्याच्या सुमारास खेड घाटातील पाहिल्या वळणावर मोठा ट्रक बंद पडल्याने तेंव्हापासून वाहतुकीची कोंडी सुरूं झाली. त्यामुळे वाहनाच्या तीन ते चार किलोमीटर पर्यंत रांगा लागल्या होत्या. त्यात अतिघाई करणाऱ्या वाहन चालकांमुळे हि वाहतूक कोंडी अजूनच वाढली. अरुंद घाट रस्ता आणि त्यातील अरुंद वळणावर ट्रक बंद पडल्याने तो काढण्यासाठी पोलिसांना मोठी कसरत करावी लागली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.