पुण्यातील मोठ्या सोसायट्या करोनाच्या विळख्यात

..तर सिंहगड रस्त्यावरील सोसायट्या मायक्रो कंटेन्मेंट झोन

सिंहगड रस्ता – शहरात मागील दोन आठवड्यांपासून करोनाचे नवे बाधित वाढले आहेत. त्यात, सिंहगड रस्ता परिसरातही पुन्हा रुग्ण वाढत आहेत. प्रामुख्याने धायरी, वडगाव आणि सनसिटी रस्ता परिसरातील मोठ्या सोसायट्यांत सर्वाधिक नवीन रुग्ण सापडत आहेत. त्यामुळे या सोसायट्यांमध्ये पुढील काही दिवस असेच रुग्ण सापडत राहिल्यास या सोसायटया मायक्रो कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करून या भागांत प्रतिबंध घातले जाण्याची शक्‍यता महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयाने व्यक्त केली आहे.

शहरात मागील वर्षी पहिला करोनाबाधित सिंहगड रस्ता परिसरात सापडला होता. देशव्यापी लॉकडाऊननंतर या भागातील करोना रुग्णांची संख्या नियंत्रणात आली. जूनपासून लॉकडाऊन शिथिल होतानाच; सिंहगड रस्ता परिसर करोनाचा हॉटस्पॉट बनला होता. त्यानंतर नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये या भागातील रुग्णसंख्या लक्षणीय कमी झाली होती.

मात्र, फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून शहरात पुन्हा नव्याने बाधित वाढण्यास सुरूवात झाली आहे. यात सिंहगड रस्ता परिसरातही दिवसाला 50 ते 60 रुग्ण सापडत आहेत. त्यातील 50 टक्के रुग्ण हे सनसिटी परिसरातील सोसायट्यांतील आहेत. तर उर्वरित रुग्ण धायरी आणि वडगाव भागांतील मोठ्या सोसायट्यांतील असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे सोसायट्यांनी नागरिकांना एकत्र करून कार्यक्रम तसेच बैठका घेऊ नयेत. करोना प्रतिबंधात्मक नियमांची अंमलबजावणी करावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

सिंहगड रस्ता परिसरात मोठ्या सोसायट्यांत करोनाचे बाधित अधिक आहेत. त्यामुळे अशा सोसायट्यांशी संपर्क साधून त्यांना सूचना दिलेल्या आहेत. त्यानंतरही नागरिक सूचनांचे पालन करत नसल्याने रुग्णांची संख्या वाढल्यास अशा सोसायट्या मायक्रो कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करून त्यांच्यावर निर्बंध घातले जातील.
– संतोष भाईक, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक, सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालय

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.