बीजिंग – चीनच्या राजधानीत करोनाच्या चाचण्या मोठ्या प्रमाणावर हाती घेण्यात आल्या असून त्या शहरात करोनाचे पुन्हा एकूण 42 रुग्ण आढळून आल्याने करोना नियंत्रणाचे तेथे व्यापक उपाय हाती घेण्यात आले आहेत. चीन करोनामुक्त झाल्याची घोषणा करण्यात आल्यानंतर आता थेट राजधानी बीजिंगमध्येच करोनाचा फैलाव झाल्याने प्रशासनाची पुन्हा धावाधाव सुरू झाली आहे.
बीजिंगमध्ये शिफादी होलसेल फूड मार्केटमधून 30 मे पासून पुन्हा करोनाचा शिरकाव झाल्याचे सांगण्यात येत असून कालपासूनच हे मार्केट बंद करण्यात आले आहे. या मार्केटमध्ये प्रवेश केलेल्या नागरिकांना हुडकून काढून त्यांची तपासणी आता सुरू करण्यात आली आहे. आत्तापर्यंत तेथील एकूण 29 हजार 386 नागरिकांच्या चाचण्या करण्यात आल्या आहेत. बीजिंगच्या आरोग्य विभागाच्या
आयुक्तांनी सांगितले की बीजिंगमध्ये करोनाचे 36 नियमित पेशंट आढळून आले आहेत तर 6 जणांमध्ये कोणतीच लक्षणे दिसत नसली तरी त्यांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. स्थानिक पातळीवरूनच हा प्रसार झाल्याचे त्यांनी मान्य केले.
यातील कोणताही रुग्ण विदेशातून मायदेशात परत आलेल्यांपैकी नाही. गेल्या जानेवारी महिन्यापासून बीजिंग मध्ये एकूण 499 कन्फर्म केसेस आढळून आल्या असून त्यातील 79 जणांवर अजून उपचार सुरू आहेत.