फलटण तालुक्‍यात मोठ्या प्रमाणात वाळूची चोरी

फलटण  -फलटण तालुक्‍यात वाळूचा मोठ्या प्रमाणावर उपसा होत आहे. शहरालगतच कोळकी गावच्या हद्दीत कोळकी तलाठी कार्यालयांलगत असणाऱ्या ओढ्यातून होणाऱ्या वाळू उपशाबाबत आश्‍चर्य व्यक्त होत आहे.

फलटण तालुक्‍यात वाळू सम्राटांनी पुन्हा एकदा डोके वर काढले असून नूतन तहसीलदार समीर यादव यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अवैध वाळू व इतर गौणखनिज उपसा वाढला आहे. वाळू उपशावर समीर यादव काहीतरी नियंत्रण आणतील असे वाटत असताना ग्रामीण भागासह खुद्द शहरातही वाळू चोरीचे प्रमाण वाढले आहे. वाळू उपशामागे कुणाकुणाचे हात आहेत, हा संशोधनाचा विषय झाला आहे. दोन दिवसांपूर्वी शहरातील महाराज मंगल कार्यालयाच्या शेजारी फलटण- कोळकी गावाच्या ओढ्यातील वाळूकडे वाळूसम्राटांची नजर गेली. याच ठिकाणी कोळकी तलाठी कार्यालय असून कार्यालयाच्या शेजारीच दिवसाढवळ्या वाळू उपसा सुरू केला गेला व पावसामुळे मोठ्या प्रमाणात जमा झालेल्या काळ्याभोर वाळूवर डल्ला मारण्यात आला.

यावेळी वाळू सम्राटांनी महसूल व्यवस्था खिशात असल्याचे दाखवत दिवसाच वाळूचे ढीग लावून मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा केला. यापूर्वी ग्रामीण भागात रात्रीच्या वेळी अंधारात वाळू चोरीची कामकाज करणारी यंत्रणा उघडपणे शहरातील ओढ्यातून वाळू उपसा करू लागल्याने अनेकांनी महसूल विभागाचे वाभाडे काढले. ग्रामीण भागातील नदी व ओढ्यातून मोठ्या प्रमाणात वाळू उपसा सुरू असून लाखोंचा महसूल बुडीत होत वाळूची उपसा व विक्री सुरू आहे. शहरात व ग्रामीण भागात अनेक ठिकाणी बांधकामे सुरू असून याठिकाणी पाहणी केली असता मोठ्या प्रमाणात चोरीच्या वाळूची साठेबाजी होत आहे. याकडे स्थानिक पातळीवर तलाठी व पोलीस कर्मचारी सोयीस्कर दुर्लक्ष करत आहेत. हीच अवस्था मुरूम व काळ्या मातीची असून अवैध गौणखनिज उपसा करून तो राजरोस वाहतूक करून चढ्या भावाने विकले जात आहे. शहरातील बाणगंगा नदी यातून सुटली नसून अनेक ठिकाणी वाळू उपसा सुरू आहे.

 

तहसीलदारांकडून कारवाईची अपेक्षा
तालुक्‍यात वाळू उपशावर कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसल्याने मोठ्या प्रमाणावर वाळू उपसा सुरू आहे. तहसीलदार समीर यादव यांनी अशा निर्ढावलेल्या वाळू उपशावर दुर्लक्ष न करता कडक कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे. तालुक्‍यातील वाळू उपसा व त्यावर होत नसलेली कारवाई पहाता महसूल विभागाने जाणीवपूर्वक डोळे मिटून घेतले की काय असा प्रश्‍न निर्माण होत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.