मोठ्या शक्‍तिप्रदर्शनाने डॉ. विखेंचा अर्ज दाखल

खा. गांधी झाले सुचक; आ. मुरकुटे वगळता सर्व आमदार हजर

अन्‌ विखेंची झाली धावपळ

हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत डॉ. सुजय विखे अर्ज भरण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आले. परंतु अर्ज दाखल करतांना त्यांच्या काही स्वाक्षऱ्या राहिल्याचे लक्षात आले. त्यामुळे डॉ. विखेंची एकच धावपळ झाली. ऐनवेळी त्यांनी चक्‍क एका वाहनाच्या बोनेटवर घाईघाईत स्वाक्षरी केली. त्यानंतर ते अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे गेले.

नगर – नगर लोकसभा मतदारसंघासाठी भाजपचे उमेदवार डॉ. सुजय विखे यांनी आज जोरदार शक्‍तीप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला. डॉ. विखे यांनी तीन उमेदवारी अर्ज दाखल केले असून त्यातील एका उमेदवारी अर्जावर भाजपचे विद्यमान खासदार दिलीप गांधी हे सुचक आहेत. नेवाश्‍याचे आमदार बाळासाहेब मुरकुटे वगळता सर्व भाजप व शिवसेनेचे आमदार व नेते, प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे अर्ज दाखल करण्यात आले.

सकाळी दहा वाजता दिल्ली दरवाजापासून रॅलीस प्रारंभ झाला. तेथून चितळे रस्ता, नेता सुभाष चौक, कापडबाजार मार्ग जिल्हाधिकारी कार्यालयात रॅली नेण्यात आली. त्यापूर्वी डॉ. विखे यांनी नगरचे ग्रामदैवत श्री विशाल गणपतीची आरती केली. तेथून जुन्या बसस्थानकाजवळील शिवाजी महाराजाच्या पुतळ्याला पुष्पहार घालण्यात आला. त्यानंतर बाजार समिती चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर दिल्ली दरवाजा येथून रॅली काढण्यात आली.

जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी पावणे बारा वाजता डॉ. विखे आले. त्यावेळी जलसंपदामंत्री गिरीश महाजन, दुग्ध विकासमंत्री महादेव जाणकर, पालकमंत्री प्रा. राम शिंदे, विधानसभेचे उपाध्यक्ष विजय औटी, खासदार दिलीप गांधी, आ. शिवाजी कर्डिले, आ. मोनिका राजळे, आ. स्नेहलता कोल्हे, शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड, माजीमंत्री बबनराव पाचपुते, भाजपचे जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे, उत्तर जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे, महापौर बाबासाहेब वाकळे, ऍड. अभय आगरकर यांच्यासह डॉ. विखे यांच्या पत्नी धनश्री विखे व काका राजेंद्र विखे उपस्थित होते.

उमेदवारी अर्ज दाखल करतांना आई-वडिलांना हजर राहता येत नाही. परंतु वडिलधारी म्हणून जलसंपदामंत्री गिरीश महाजन हे उपस्थित राहिले. तसेच पालकमंत्र्यांनी देखील पालकत्व स्वीकारले आहे. पक्षाने उमेदवारी दिल्याने आज मला ही निवडणूक लढता येत आहे. या मतदारसंघात विकासाचे कामे आणखी जोमाने करण्याचा माझा प्रयत्न राहील.

डॉ. सुजय विखे,भाजप उमेदवार

आगे आगे देखो होता है क्‍या, राजकारणात काहीही होऊ शकते. त्यामुळे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे काय करतील हे मला सांगता येणार नाही. आज कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीत ताळमेळ नाही. तो पक्षांतर्गत व घरात देखील नाही. त्यामुळे 60 ते 70 वर्षांनंतर अशी स्थिती आली की आघाडीला उमेदवार मिळेनात. एवढी वाईट स्थिती झाली आहे. त्यामुळे युतीला यावेळी राज्यात सर्वाधिक जागा मिळतील. नगरची जागा सर्वाधिक मताधिक्‍क्‍याने विजयी होईल.

गिरीश महाजन, जल संपदामंत्री

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.