वानवडी, दि. 21 -गणेशोत्सव काळात ढोल-ताशा या पारंपरिक वादनाची क्रेझ दिवसेंदिवस वाढत आहे. गणेशोत्सव जवळ आल्याने ढोलताशा पथकांचा सराव अंतिम टप्प्यात आला आहे. ताल व लयबद्ध वादनाने ही पथके सगळ्यांनाच थिरकायला लावत आहेत.
उपनगरांत अनेक ठिकाणी चौकाचौकांत, पुलांखाली, मोकळ्या जागांवर ढोलताशा पथकांचा जोरदार सराव सुरू आहे.
सध्या गणपतीसाठी नवीन लय, ठेका व ताल शिकण्यासाठी बहुतांश ढोलताशा पथकातील सदस्य सध्या सरावातून मेहनत घेत आहेत.
गणपतीनिमित्त जवळपास दीड महिना आधीपासून सराव सुरू होतो. उपनगरांत सायंकाळी 5 ते 8 या वेळेत सराव चालतो. पथकात साधारण 8 ते 9 वयोगटापासून 45 वर्षे वयोगटाचे 200 पेक्षा अधिक सदस्य असतात. काही पथक सदस्यांकडून शुल्क घेतात तर काही घेत नाहीत. यात 1 ते 5 असे पारंपारिक ताल असतात. याला पारंपारिक हात चालविणे असेही म्हटले जाते. सामान्य जनतेला आनंद मिळेल, अशा ठेक्यांना अधिक पसंती मिळते.
अन्य सण-उत्सवांनाही केले जाते वादन
फक्त गणेशोत्सवच नाही, तर शिवजयंती, शिवराज्याभिषेक दिन सोहळा, नवरात्र, पाडवा अशा विविध सणांवेळी हमखास ढोल-ताशा पथक आपल्या पारंपरिक कलेचे सादरीकरण करताना दिसतात. काही ढोलताशा पथक अनेक सामाजिक उपक्रम देखिल राबवतात. गणेशापुढे मानवंदनाही देताना हे वादक अत्यंत उत्साही असतात.
नियम पाळणे आवश्यक
प्रत्येक ढोल-ताशा पथकाचे स्वतःचे काही नियम असतात. ते सदस्यांना तंतोतंत पाळावे लागतात. त्यामध्ये व्यसनाधिनता व गैरवर्तन चालत नाही. सरावास नियमित हजर राहणे, गणवेश परिधान करावा, मुलींनी मुलींचा ढोल स्वतः ताणावा (ओढावा) व त्यांनीच तो उचलावा. यामध्ये पालकांची परवानगी आवश्यक असते. पथकात प्रामुख्याने ढोल, ताशा, टोल, ध्वज (ध्वजावर मानाचा कळस) टोल गाडी व झांज आदी साहित्याचा समावेश असतो. वेळोवेळी या सर्व साहित्याची योग्य देखभाल करावी लागते.