परदेशी गुंतवणूकदारांची भारतात मोठी “गुंतवणूक’

नवी दिल्ली – परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदार भारतीय बाजारांमध्ये गेल्या काही महिन्यापासून गुंतवणूक वाढवीत आहेत. 20 डिसेंबर पर्यंत या गुंतवणूकदारांनी भारतात 55 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे.

डिपॉझिटरीनी जारी केलेल्या माहितीत म्हटले आहे की, यातील 49 हजार कोटी रुपये शेअर बाजारात आणि 6 हजार कोटी रुपये कर्ज रोखे बाजारात गुंतविण्यात आले. नोव्हेंबर महिन्यात या गुंतवणूकदारांनी 63 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली होती.

मॉर्निंग स्टार इंडिया या संस्थेचे विश्‍लेषक हिमांशु श्रीवास्तव यांनी सांगितले की, विकसित देशात अतिरिक्त भांडवल सुलभता निर्माण झाली आहे. तेथील व्याजदर कमी असल्यामुळे भारतासारख्या देशात तेथील संस्थागत गुंतवणूकदार गुंतवणूक करीत असल्याचे दिसून येते. दरम्यानच्या काळात डॉलर कमकुवत झाल्यामुळे स्थानिक पातळीवरील गुंतवणुकीपेक्षा इतर देशात केलेली गुंतवणूक या गुंतवणूकदारांना अधिक परतावा देते.

आतापर्यंत परदेशी संस्थागत गुंतवणूकदार शक्‍यतो लार्ज कॅपमध्ये गुंतवणूक करीत होते. मात्र सध्या लार्ज कॅपमधील कंपन्यांच्या शेअरचे भाव विक्रमी पातळीवर गेले आहेत. त्यामुळे आता हे गुंतवणूकदार भारतातील स्मॉल आणि मिड कॅप कंपन्यातही गुंतवणूक करीत असल्याचे चित्र बाजारात आहे.
विकसित देशांच्या तुलनेत भारतीय अर्थव्यवस्था मजबूत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

दुसऱ्या आणि तिसऱ्या तिमाहीत भारतातील कंपन्यांनी चांगले ताळेबंद जाहीर केले आहेत. त्यामुळे सध्या भारतीय शेअर बाजार निर्देशांक विक्रमी पातळीवर गेले आहेत. अशीच परिस्थिती आगामी काही काळ तरी चालू राहण्याची शक्‍यता असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.