नगर: रजा मंजूर नसतानाही परस्पर रजेवर गेल्याने महानगरपालिकेतील लिपिकाला सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांच्या आदेशाने सदर कारवाई करण्यात आली.
मनपाच्या माळीवाडा प्रभाग कार्यालयातील लिपिक विद्याधर सीताराम कुकडे असे कारवाई झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. 9 एप्रिल 2011 पासून कोणतीही रजा मंजुरी न घेता ते परस्पर रजेवर गेले होते. 2013 मध्ये त्यांच्यावर चौकशी प्रस्तावित करण्यात आल्यानंतर त्यांनी कामावर रुजू करुन घेण्याची विनंती केली होती. त्यानुसार त्यांना कामावर रुजू करवूनही घेण्यात आले होते. मात्र, त्यानंतर पुन्हा ते गैरहजर आहेत. कुकडे हे कुठलीही रजा मंजूर न करतात अनेक वेळा गैरहजर राहात असल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
कुकडे यांना नोकरीची गरज नसल्याचे निदर्शनास येत असून, कार्यालयीन शिस्तीचा त्यांनी भंग केला असल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. मनपा अधिनियमातील कलमानुसार त्यांच्यावर बडतर्फीची कारवाई करण्यात आली आहे.