काठमांडू – पश्चिम नेपाळमध्ये प्रबात जिल्ह्यात कुश्मा महापालिकेच्या हद्दीमध्ये झालेल्या भूस्खलनामध्ये काही घरे गाडली गेली असून किमान 3 जण ठार आणि 5 जण जखमी झाले आहेत. शनिवारपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे हे भूस्खलन झाले आहे.
मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले असून ढिगाऱ्याखालून आतापर्यंत 5 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तर अद्याप तिघे जण बेपत्ता आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
पोलीस, सशस्त्र दल आणि नेपाळ आपत्ती व्यवस्थापनाचे कर्मचारी ढिगारे उपसण्याचे काम करत आहेत, असे अधिकारी म्हणाले. शोधासाठी अधिक मनुष्यबळ आणि यंत्रसामुग्री घटनास्थळी रवाना करण्यात आली आहे.
दरडी कोसळण्याच्या घटनांमुळे या भागातील महामार्ग बांधणीचे काम स्थगित करण्यात आले आहे. पावसामुळे भुसभुशीत झालेली माती घसरण्याने भूस्खलन घडते आणि उतारावरील अनेक मोठे धोंडेही उतारावरून घरंगळत जाऊन खालील गावात पडत असतात. या भागात दरडी कोसळण्याच्या घटना पावसाळ्याच्या दिवसात वारंवार घडत असतात.