केरळमधील भूस्खलनात पाच जणांचा मृत्यू; ८० लोक अडकल्याची भीती

नवी दिल्ली – केरळमध्ये मुसळधार पाऊस सुरु असून अनेक भागात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. अशातच इडुक्की जिल्ह्यात भूस्खलन झाले आहे. यामध्ये पाच जणांचा मृत्यू झाला आहे. तर ८० पेक्षा जास्त लोक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, वन अधिकारी आणि एनडीआरएफ दल कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून १० जणांना वाचविण्यात यश आले आहे.

अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, जिल्ह्याच्या राजमला परिसरात भूस्खलन झाले असून याठिकाणी पोहचणे अवघड आहे. भूस्खलनात चहा कामगारांची वीस घरेही नष्ट झाली आहेत. मातीच्या ढिगाऱ्याखाली ७० ते ८० लोक अडकल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे.

मुख्यमंत्री कार्यालयाने मदतकार्यासाठी हवाई दलाकडे मदत मागण्यात आली आहे. याआधीही गुरुवारी इडुक्की जिल्ह्यातील तात्पुरता पूलही कोसळला होता.

दरम्यान, केरळमध्ये मागील तीन दिवसांपासून अतिवृष्टी सुरु असून हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.