मंदोशी घाटात भूस्खलन

खेड तालुक्‍यातून भीमाशंकरकडे जाणारा रस्ता वाहतुकीसाठी बंद

राजगुरूनगर – सलग दोन दिवस भोरगिरी भीमाशंकर परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे. यामुळे खेड तालुक्‍याच्या पश्‍चिम भागातील रस्त्यावरील पूल पाण्याखाली गेले आहेत. तर भीमाशंकरला जाणाऱ्या मंदोशी घाटात तीव्र चढ व वळण असलेल्या भागाजवळील रस्त्याचे भूस्खलन झाल्याने रस्त्याचा मोठा भाग खाली खचला आहे. यामुळे भीमाशंकरकडे जाणारा रस्ता चारचाकी वाहनांसाठी बंद झाला आहे. तर तळेघर, उगलेवाडी, बांगरवाडीत जाणारा मार्ग बंद झाला आहे.

खेड आणि आंबेगाव तालुक्‍याला जोडणाऱ्या मंदोशी घाटातील रस्ता जवळपास 30 ते 50 फूट खाली खचल्याने वाहतूक बंद झाली आहे. पावसाचा जोर वाढल्यास आणि उर्वरित रस्ता खचल्यास भविष्यात हा रस्ता पूर्णतः बंद होण्याची भीती निर्माण झाली आहे. या रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे.

कुमंडला, भीमा, आरळा नदी दुथडी
आज सकाळपासून झालेल्या जोरदार पावसामुळे कुमंडला, आरळा, भीमानदी दुथडी भरून वाहत आहे. तर कडूस गावाजवळील पूल पाण्याखाली गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे. गुंडाळवाडी-जवळी पुलावर पूल पाण्याखाली गेल्याने राजगुरूनगर-वाडा रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाली आहे.

चासकमान 85 टक्‍के भरले
भोरगिरी भीमाशंकर परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे ओढे नाले आणि नद्यांना पुराचे स्वरूप आले आहे. तर चासकमान धरण 85 टक्‍के भरले आहे. धरणात सरासरी 30 हजार क्‍युसेकने पाणी जमा होत असून धरणातून भीमानदीत पाणी सोडण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. यामुळे भीमानदीला मोठ्या पुराचे स्वरूप येणार असून धारणाखालील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.