दौंड/ बारामती- दारूच्या अमलाखाली ठेवून दहा लाखांच्या व्याजाच्या पैशाच्या बदल्यात साठ लाख रुपयांची जमीन संगनमताने लाटल्याप्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात दोन सावकार व त्यांचे चार साथीदार असा सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी दीपक गायकवाड, वैशाली तुपे, गजानन तुपे, ताजुद्दीन पठाण (सर्व रा. हडपसर) दत्तात्रेय गाढवे, (रा. रावणगाव, ता. दौंड) व हौसेराम आटोळे (रा. कौठडी ता. दौंड) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
गणेश माळवे (रा. हांडेवाडी रोड, हडपसर पुणे) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, गणेश माळवे हे त्यांच्या कुटुंबासमवेत हडपसर येथील रहिवासी असून शेती हे त्यांच्या उपजीविकेचे साधन आहे. वडील बबन माळवे यांनी कोराळे बुद्रुक येथील त्यांची वडिलोपार्जित जमीन विकून मळद (ता. दौंड) येथे दोन एकर जमीन खरेदी केली. वडील आजारी पडल्याने मुलगा गणेश माळवे यांच्या नावे केली. मात्र, गणेश यांना दारूचे व्यसन होते. त्यांचे दारूचे व्यसन सोडण्यासाठी कुटुंबीयांकडून सातत्याने प्रयत्न सुरू होते. त्यासाठी त्यांना पैशाची गरज होती. दीपक गायकवाड यांनी माळवे कुटुंबीयांना वेळोवेळी पैसे दिले होते. एक लाख रुपये झाले असून माझे पैसे मला परत कर, अशी मागणी गायकवाड करीत होते. पैशांसाठी धमकी ते देत होते.
दि.20 ऑक्टोबर 2019 रोजी गायकवाड याने बबन माळवे यांना पार्टीला म्हणून हडपसर येथील हॉटेलमध्ये नेले. माझे घेतलेले पैसे देण्यासाठी तुझ्याकडे पैसे नसतील तर मी तुला हडपसर येथील तुपे यांच्याकडून व्याजाने पैसे देतो. एक वर्षांनी ते पैसे तू परत कर, असे सांगितले. तुपे यांच्याकडून तीन लाख रुपये घेतले. एक वर्षांनंतर दीडपट पैसे देण्याचे ठरले. हे होताना वैशाली तुपे यांनी पाच कोऱ्या धनादेशवर सह्या घेतल्या. गट नंबर 248/1 मधील जमिनीचे गहाणखत करून देण्याचे ठरले. फिर्यादीस पाच लाखांचा जनसेवा सहकारी बॅंक ससाणेनगर येथील खात्यावरील धनादेश दिला. दीपक गायकवाड यांनी दोन लाख रुपये स्वतःचे घेतले. दुसऱ्यादिवशी जमिनीचे गहाणखत करून देण्याचे ठरले. केडगाव येथील रजिस्टर कार्यालयात नेले. त्यावेळी कार्यालयात गजानन तुपे, वैशाली तुपे, अतुल वाडकर उपस्थित होते. कार्यालयात निघण्याआधी दीपक गायकवाड यांनी बबन माळवे यांना दारूच्या अमलाखाली ठेवल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. फिर्यादीला दारूच्या नशेत ठेवून गहाणखताऐवजी खरेदीखत करून घेतले. गहाणखताचे ठरले असताना खरेदीखत करून घेऊन फसवणूक केल्याचे फिर्यादीने म्हटले आहे.
दरम्यानच्या काळात दीपक गायकवाड याने तुला तुपे यांचे पैसे एक वर्षात परत करायचे आहेत. नाहीतर ते तुझी जमीन विकून टाकतील, असे सांगितले. तुला जिवंत सोडणार नाहीत. इतर जमीन तुला गहाण ठेवावी लागेल, असे सांगू लागला. तुपे यांचे पैसे देण्यासाठी दीपक गायकवाड यांच्या ओळखीच्या प्लंबर ताजुद्दीन पठाण व दत्तात्रेय गाढवे (रा. मळद, पाटस) यांच्याकडून सात लाख रुपये व्याजाने घेण्यास भाग पडले. त्याबदल्यात दहा लाख देण्याचे ठरले. या पैशाला एक वर्ष झाले आहे. अधिक तपास पोसई लोंढे करीत आहेत.
फिर्यादीच्या कोऱ्या धनादेशाचा गैरवापर
मुदतीपूर्वीच आमचे साडेचार लाख रुपये हवेत, नाहीतर तुमची जमीन विकून टाकू, असा तगादा तुपे यांनी लावला. तुपे यांच्याकडून जमीन सोडवण्यासाठी दत्तात्रय गाढवे यांच्याकडून सात लाख रुपये व्याजाने घेतले. त्याबदल्यात त्यांना दोन एकर जमीन गहाण खत म्हणून दिली. मात्र, दारूच्या नशेचा फायदा घेत गहाणखतऐवजी खरेदीखत करून फसवणूक केली. दारूच्या नशेतून बाहेर आल्यानंतर तसेच पैशांची मुदत संपल्यानंतर पैसे देण्यासाठी गेल्यानंतर हा प्रकार समोर आला. दिलेले पैसे जमिनीचा मोबदला म्हणून दाखवले. कोऱ्या धनादेशाचा गैरवापर केला असून संगनमताने जमीन लाटल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. दरम्यान, माळवे यांना दिलेले पैसे त्यांनी दिलेल्या कोऱ्या धनादेशाच्या साह्याने काढले होते. पोलीस ठाण्यात तक्रार देणार असल्याचे सांगताच ते पैसे पुन्हा माळवे यांच्या खात्यावर जमा झाले, असे फिर्यादीत म्हटले आहे.