ट्रान्सफॉर्मरकरिता दिली लाखोंची जमीन

तापकीर कुटुंबियांकडून काळेपडळमधील नागरिकांसाठी व्यवस्था

पिंपरी-च ऱ्होली येथील काळेपडळ व दत्तनगर भागातील नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेत, लाखो रुपये किंमतीची सुमारे अर्धा गुंठे जागा नियोजित ट्रान्सफॉर्मरकरिता रामदास तापकीर यांनी उपलब्ध करुन दिली. महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांशी झालेल्या चर्चेनुसार येत्या महिनाभरात सर्व सोपस्कर पूर्ण करुन याठिकाणी नवा ट्रान्सफॉर्मर बसविला जाणार आहे.

आळंदी-पुणे रस्त्यापासून जवळपास अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या दत्तगर, काळेपडळ या भागाची लोकसंख्या सुमारे 550 एवढी आहे. मात्र, आता यापरिसरात अलंकापुरम व अन्य रहिवासी सोसायट्यांचे बांधकाम झाल्याने मोठ्या प्रमाणावर नागरीकरण झाले आहे. परिणामी या परिसरातील जागेला आता सोन्याचा भाव आला आहे. या भागात अनेक नागरिकांनी गुंठा-अर्धा गुंठा जागा घेऊन बांधकामे केली आहेत. परिणामी याठिकाणची लोकसंख्या वाढल्याने चोवीसावाडीहून होणाऱ्या वीज पुरवठ्यावर ताण येऊन वारंवार वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढले होते.

या सर्व घडामोडींच्या पार्श्‍वभूमीवर याठिकाणी नवीन ट्रान्सफॉमर बसविण्याची मागणी मनसेचे भोसरी विभागप्रमुख अंकुश तापकीर यांनी महावितरण कंपनीकडे केली होती. मात्र, या परिसरात नियोजित ट्रान्सफॉर्मकरिता जागा उपलब्ध नसल्याने महावितरण कंपनीदेखील हतबल होती. मात्र, अंकुश तापकीर यांचे वडील रामदास दशरथ तापकीर यांनी या परिसरातील नागरिकांची गैरसोय दूर व्हावी, याकरिता 250 चौरस फुट जागा ट्रान्सफॉर्मरकरिता देण्याची तयारी दशरविली. सुरक्षेच्या कारणास्तव ट्रान्सफॉमरलगतची 250 ते 300 चौ. फुट जागा कोणत्याही कारणासाठी वापरता येणार नसल्याने सुमारे अर्ध्या गुंठ्यापेक्षा अधिक जागा याठिकाणी जाणार आहे.

नव्या ट्रान्सफॉर्मरकरिता महावितरणशी लेखी पत्रव्यवहार करुन सर्व सोपस्कर पूर्ण करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. या परिसरातील नागरिकांना वीजपुरवठ्याची समस्या भेडसावत होती. मात्र, ट्रान्सफॉर्मरकरिता आवश्‍यक असलेली जागा उपलब्ध होत नव्हती. मनसेने याबाबत कार्यवाही करण्याची मागणी केली होती. त्याला माझ्या घरातूनच प्रतिसाद मिळाला. त्यामुळे महावितरण कंपनी अधिकाऱ्यांच्या संपर्कात राहून सर्व सोपस्कर पूर्ण करुन महिनाभरात याठिकाणी नवा ट्रान्सफॉमर बसविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
अंकुश तापकीर, भोसरी विभागप्रमुख, मनसे

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.