पुणे – पुरंदर येथे उभारण्यात येणाऱ्या छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी नागरिकांना विश्वासात घेऊन लवकरात लवकर भूसंपादन करण्याची कार्यवाही करा, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिल्या.
पुरंदर विमानतळाच्या प्रश्नासंदर्भात पवार यांनी शनिवारी बैठक घेतली. याबैठकीत त्यांनी या सूचना दिल्या. यावेळी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचे अधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी उपस्थित होते. पुरंदर विमानतळासंदर्भात भूसंपादन हा एक महत्त्वाचा टप्पा बाकी आहे. त्यावर अद्यापही निर्णय झालेला नाही. याविषयी पवार यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. पुरंदर विमानतळासाठी आवश्यक असलेल्या जागेचे भूसंपादन करण्याबरोबरच भूसंपादनासाठी चांगले अधिकारी नेमण्याच्या सूचना पवार यांनी दिल्या. त्याचबरोबर पुरंदर विमानतळासंदर्भात पुन्हा बैठक घेणार असल्याचे पवार यांनी सांगितले.
पुरंदर येथे विमानतळ उभारण्यासाठी सुमारे 2 हजार 832 हेक्टर जागा लागणार आहे. या कामासाठी विमानतळ विकास कंपनीला विशेष अधिकार देण्यात आले आहेत. 2 हजार 832 हेक्टरपैकी 2 हजार हेक्टरवर प्रत्यक्षात विमानतळ उभारण्यात येणार आहे. विमानतळाचा मास्टर प्लान तयार करण्याचे काम यापूर्वीच कंपनीकडून “डार्स’ या कंपनीला देण्यात आले आहे. तर उर्वरित 832 हेक्टर जागेवर विमानतळासाठी आवश्यक त्या पायाभूत सुविधा उभारण्यासाठी विकास आराखडा कंपनीकडून करण्यात येत आहे. महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडून यापूर्वीच सात गावांमधील हद्दीचे नकाशे जाहीर करण्यात आले आहे. त्यावर नागरिकांकडून सूचना हरकती मागवल्या आहेत.