पाटणा : बिहारमध्ये चालू वर्षीच्या अखेरीस विधानसभा निवडणूक होईल. त्या निवडणुकीतील उमेदवार निवडीसाठी लालूप्रसाद यादव यांच्या नेतृत्वाखालील राजदने सर्वेक्षण हाती घेतले आहे.
राजदची शनिवारी राष्ट्रीय परिषद झाली. त्यामध्ये ७८ वर्षीय लालूंची पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी फेरनिवड झाल्याची औपचारिक घोषणा करण्यात आली. त्यानंतर बोलताना लालूंनी पक्षांतर्गत सर्वेक्षणाची माहिती दिली. सर्वेक्षणाच्या माध्यमातून संभाव्य उमेदवारांची निवड केली जाईल. त्यानंतर पुत्र तेजस्वी यांच्याशी सल्लामसलत करून मी योग्य उमेदवार निवडीविषयी अंतिम निर्णय घेईल, असे त्यांनी स्पष्ट केले.
वय आणि आजारपणामुळे लालू फारसे सक्रिय नाहीत. मात्र, तरीही खुर्चीवर बसून केलेल्या भाषणावेळी त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न केला. प्रकृतीची बिल्कूल पर्वा न करता मी गरज असेल तेव्हा कार्यकर्त्यांसाठी उभा ठाकेन, अशी ग्वाही त्यांनी दिली.
आता मी तेजस्वी यांच्याकडे धुरा सोपवली आहे. त्यांच्या विजयासाठी सर्वतोपरी प्रयत्न करा, असे आवाहनही त्यांनी कार्यकर्त्यांना उद्देशून केले. बिहारमधील यावेळची निवडणूक अतिशय रंगतदार ठरण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे काटेकोरपणे उमेदवार निवडीवर राजद भर देणार असल्याचे सर्वेक्षणाने सूचित केले.