रांची – राजद पक्षाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांची प्रकृती आता आणखीनच ढासळल्याने त्यांना आता दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले जाणार आहे, अशी माहिती रांचीच्या कारागृहातील अधिकाऱ्यांनी दिली.
72 वर्षीय लालूप्रसाद यादव हे सध्या चारा घोटाळ्याच्या प्रकरणात कारावासाची शिक्षा भोगत आहेत. गेल्या दोन दिवसांपासून त्यांना श्वास घेण्यास त्रास जाणवत आहे. तशातच त्यांना न्यूमोनियाही झाला आहे. त्यांचे सध्याचे वय आणि त्यांना होत असलेला त्रास लक्षात घेऊन आम्ही त्यांना एम्समध्ये दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे, असे या अधिकाऱ्यांनी सांगितले.
या संबंधात आम्ही एम्सच्या अधिकाऱ्यांशी आणि त्यांच्या कुटुंबीयांशीही चर्चा केली आहे. त्यांच्यासाठी एअर ऍम्ब्युलन्सचीही सोय केली जात आहे. तथापि त्यांना एम्समध्ये दाखल करण्यासाठी सीबीआय कोर्टाची अनुमती घेणे आवश्यक आहे. झारखंड हायकोर्टाने कालच लालूंना नियमांचा भंग करून रांचीतील आरआयएमस रुग्णालयात दाखल केल्याबद्दल राज्य सरकार आणि कारागृह प्रशासनावर ताशेरे मारले होते.