वरिष्ठांशी चर्चेविनाच लालू यादवांचे बंगल्यात स्थलांतर; न्यायालयाने फटकारले

रांची – भ्रष्टाचारप्रकरणी कारागृहात असलेले राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव यांना करोना संसर्गाच्या भीतीने बंगल्यात स्थलांतरित करण्यात आले. यावरून उच्च न्यायालयाने अधिकाऱ्यांना फटकारले आहे. कारागृहाच्या नियमावलीचे उल्लंघन केल्याप्रकरणी झारखंड उच्च न्यायालयात या प्रकरणाची सुनावणी सुरू होती.

वरिष्ठ अधिकाऱ्यांशी विचारविनिमय न करताच लालू यादव यांना रिम्स निर्देशकांच्या बंगल्यात स्थलांतरित करण्यात आले होते. यावरून न्यायालयाने कठोर शब्दांत अधिकाऱ्यांना फटकारले. तसेच सरकार कायद्याने चालतं. कोणत्याही व्यक्तीविशेषवर नाही, असंही न्यायालयाने म्हटले. चारा घोटाळाप्रकरणी लालू यादव कारागृहात शिक्षा भोगत आहेत.

न्यायमूर्ती अपरेश कुमार सिंह यांच्या खंडपीठाने म्हटले की, करोना संसर्गाच्या शक्‍यतेसंदर्भात रिम्स प्रबंधनाला माहिती द्यायला हवी होती. त्यानंतर कारागृह अधिकारी लालू यादव यांच्यासाठी पेइंग वॉर्ड किंवा पर्यायी ठिकाणाची निवड करू शकते. याउलट रिम्स प्रशासनाने लालू यांना निर्देशकांच्या बंगल्यात स्थलांतरित करण्याची घाई का केली, असा प्रश्‍न न्यायालयाने उपस्थित केला. निर्देशकांच्या बंगल्यात स्थलांतर करण्याऐवजी रिम्सने नियम आणि अटींना अनुसरून निर्णय घेणे आवश्‍यक होते, असंही न्यायालयाने स्पष्ट केले.

दरम्यान कारागृह महानिरिक्षक आणि वरिष्ठ पोलीस अधीक्षक यांनी या प्रकरणी न्यायालयात अहवाल सादर केला. यामध्ये सरकारने म्हटले की, करोना व्हायरसच्या संसर्गाच्या भीतीने लालू यादव यांना निर्देशकांच्या बंगल्यात स्थलांतरित करण्यात आले. उपचार घेण्यासाठी कैद्याला बाहेर स्थलांतरित केल्यास त्या कैद्याची सुरक्षा कशी करणार आणि त्यासाठी काय व्यवस्था असावी, याविषयी कायद्यात तरतूद नाही. या संदर्भात नियमावली तयार करण्यात येणार असून त्यासाठी एसओपी तयार करण्यात येत असल्याचे सरकारने न्यायालयात सांगितले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.