डिसेंबरपर्यंत “व्हिटीएस’ने सज्ज होणार “लालपरी’

  • करोनामुळे काम थांबले ः वल्लभनगर आगारात अद्याप कुठलीच तयारी नाही

पिंपरी – महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) 18 हजार गाड्यांना डिसेंबरपर्यंत “व्हिटीएस’ (व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टीम) प्रणाली बसविण्यात येणार असल्याची शक्‍यता महामंडळाकडून व्यक्त केली आहे. यामुळे प्रवाशांना एसटी गाड्यांची सद्यःस्थिती कळणार आहे. एसटीच्या साध्या बसगाड्यांसह वातानुकूलित बसगाड्यांनाही “व्हिटीएस’ प्रणाली कार्यान्वित करण्याच्या कामाला गती मिळाली आहे. जवळपास 85 टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती एसटी महामंडळाने दिली. काही किरकोळ कामे नोव्हेंबर महिन्यात पूर्ण करून डिसेंबरपासून ही सेवा प्रवाशांसाठी कार्यान्वित होईल, असे महामंडळाकडून सांगण्यात आले आहे.

राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी गाड्याचे वेळापत्रक सुधारावे आणि प्रवाशांना बसची सद्य:स्थिती समजावी, यासाठी ऑगस्ट 2019 मध्ये तत्कालीन परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी “व्हिटीएस’ प्रणालीचा शुभारंभ केला होता.

नाशिक एसटी आगारातील गाड्यांवर हा प्रयोग सुरू झाला. प्रयोग सुरू असतानाच राज्यातील एसटीच्या अन्य विभागातही प्रणाली बसविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. मार्च 2020 पर्यंत सर्व बसगाड्यांना “व्हिटीएस’ बसवून प्रवाशांच्या सेवेत आणली जाणार होती.

मात्र, करोनाकाळात हे काम पूर्णपणे थांबले होते. मात्र, पुन्हा या कामाला पुन्हा सुरुवात झाली असून, एसटीच्या ताफ्यातील 18 हजार 500 गाड्यांपैकी 16 हजार गाड्यांना नवीन प्रणाली बसवून झाली आहे. आतापर्यंत 85 टक्के काम पूर्ण झाले असून, प्रणाली कार्यान्वित करण्यासाठी गती दिली जात असल्याची माहिती एसटी महामंडळाचे जनसंपर्क अधिकारी अभिजित भोसले यांनी दिली आहे. नोव्हेंबरअखेरीस सर्व गाड्यांमध्ये ही यंत्रणा बसविली जाईल. तसेच स्थानक, आगारात एलसीडी स्क्रीनही बसविले जातील. डिसेंबरपासून सेवा प्रवाशांना उपलब्ध होईल, असे सांगण्यात आले आहे.

प्रवाशांना कळणार माहिती
“व्हिटीएस’ यंत्रणेमुळे एसटी बद्दलची माहिती मोबाइलवरही “जीपीएस’ यंत्रणेद्वारे मिळणार आहे. त्यासाठी स्वतंत्र कक्ष असेल. राज्यात ज्या आगारात याचे काम पूर्ण झाले आहे, तेथे प्रवाशांसाठी आगार आणि स्थानकात स्क्रीन बसविण्यात आले आहेत. त्यावर सुटणाऱ्या व येणाऱ्या बसगाड्या कोणत्या, बसला किती वेळ लागणार आहे इत्यादी माहिती उपलब्ध होणार आहे.

वल्लभनगर आगारात तयारी नाही
राज्य परिवहन महामंडळाकडून डिसेंबरर्यंत एसटीची “व्हिटीएस’ सिस्टम (व्हेईकल ट्रॅकिंग यंत्रणा) कार्यान्वित करण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र पिंपरी-चिंचवड येथील वल्लभनगर एसटी आगारात याबाबत कुठलीही यंत्रणा बसविण्यात आली नाही. आता एका महिन्यात आगाराच्या आवारात या यंत्रेणेसंबंधी काय बदल करण्यात येतील याबाबत प्रवाशांमध्ये उत्सुकता आहे. आगार प्रमुखांशी याबाबत संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र, संपर्क होऊ शकला नाही.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.