ललिता देसाई काळाच्या पडद्याआड

पुणे – ज्येष्ठ अभिनेत्री ललिता देसाई ऊर्फ “आशु’ यांचे बुधवारी दीर्घ आजाराने निधन झाले. त्या 75 वर्षांच्या होत्या. त्यांनी अनेक मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या आहेत.

मागील अर्धशतकापासून अधिक काळ मराठी आणि हिंदीतील नाट्य आणि चित्रपट क्षेत्रांत ललिता देसाई यांनी अनेक भूमिका साकारल्या. दादा कोंडके यांच्या अनेक चित्रपटात त्यांनी सहअभिनेत्री म्हणून काम केले आहे. आचार्य अत्रे यांच्या “ब्रह्मचारी’ या नाटकात त्यांनी “किशोरी’ ही भूमिका केली होती. अत्रे यांच्याच “लग्नाची बेडी’ नाटकातील आशू यांनी केलेली “रश्‍मी’ ही भूमिका आजही रसिकांच्या आठवणीत आहे. विविध पुरस्कारांनी त्या सन्मानित होत्या. 

“लग्नाची बेडी’, “गुंतता हृदय हे’, “नाथ हा माझा’, “अपराध मीच केला’, “तुझे आहे तुजपाशी’, “अभिलाषा’, “मॅडम’ आदी नाटकांमध्ये त्यांनी भूमिका साकारली आहे. तर “कब क्‍यो और कहा’, “अमर प्रेम’, “संतान’, “सीता और गीता’, “यादो की बारात’ आदी हिंदी चित्रपटात त्यांनी भूमिका साकारल्या आहेत. सन 1984 पासून आशु यांच्यासोबत असणाऱ्या उमा यांनी “आता पोरकी झाली आहे,’ अशी भावना व्यक्त केली. त्यांच्या पश्‍चात पती त्रिहान आणि मुलगा बिनोज असा परिवार आहे. गुरुवारी (17 सप्टेंबर) रोजी सकाळी 11 वाजता वैकुंठ स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार असल्याचे बिनोज यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.