ललित : श्रमही निमाले!

शर्मिला जगताप

एका टुमदार गावात एका भल्यामोठ्या आंब्याच्या झाडावर एका चिमणीचे घरटे होते. त्या घरट्यात चिव चिव करणारे दोन इटुकली पिटुकली पिले होती. चिमणी गावात, शेतात फिरून ज्वारीने दाणे चोचीत घेऊन पुन्हा घरट्याकडे फिरत असे. सांजवेळेला तर अन्नाची साठवण करत लगबगीने घरट्याकडे पिलांच्या आठवणीने भरारी मारत असे. हा नित्यक्रम.

एके दिवशी एक भला मोठा साप घरट्यात डोकावत होता. पिलांचा थरकाप उडाला. त्यांनी चिवचिवाट सुरू केला. चिमणीने पिलांना आपल्या पंख्याखाली घेतले आणि आपल्या चोचीत सर्व शक्‍ती एकवटून सापाच्या तोंडावर चोचीने प्रहार करू लागली. या अनपेक्षित हल्ल्यामुळे साप घाबरला. त्याच्या तोंडातून रक्‍त बाहेर यायला लागले. तसा त्याने तेथून पळ काढला. थरथरणारी पिले पंखाखालून बाहेर आली. चिमणीने त्यांना गोंजारले. तसे पिले ताजेतवाने झाले. आयुष्यात अशा अनेक प्रसंगातून पिलांना जावे लागणार होते.

एके दिवशी काही उनाड पोरे अंब्यांच्या झाडाला दगड मारून कैरी पाडत होते. चिमणी या वेळेला पिलांसाठी खाऊ आणायला बाहेर गेली होती. मुलांचा झाडाखाली गोंगाट सुरू झाला. त्यामुळे पिले घाबरली. तेवढात चिमणी झाडाजवळ पोहोचली. झाडाला दगड मारत असलेली मुले पाहून चिमणीच्या काळजात धस्स झाले. चिमणीने लगेच घरट्यात धाव घेतली. पिलांना सुरक्षित पाहून तिचा जीव भांड्यात पडला. 

मात्र टार्गट पोरांचा गोंगाट काही थांबेना. त्यांचा दगड आपल्या पिलांना लागू नये म्हणून तिने घरट्याच्या दारावर आपले पंख पसरवून बसली. तेवढ्यात भिरभिरत एक दगड तिच्या डोक्‍याला लागला. क्षणभर सर्वकाही शांत झाले. तिला आपली पिले दिसेनाशी झाली. तिने कंठात प्राण आणून पिलांना आवाज दिला. पण तिची चोच उघडलीच नाही. ती घरट्यातून भोवळ येऊन खाली जमिनीवर पडली. तिच्या पिलांनी चिवचिवाट केला. आपल्या पिलांना शेवटचे पाहत चिमणीने पापण्या मिटल्या.

ना. वा. टिळक “केवढे हे क्रौर्य’ या कवितेत म्हणतात-
मातीत ते पसरिले अतिरम्य पंख, केले वरी उदर पांडुर निष्कलंक, चंचू तशीच उघडी पद लांबवीले, निष्प्राण देह पडला! श्रमही निमाले!

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.