कोल्हापूर : कोल्हापूरच्या श्री अंबाबाई देवीची आज (ता.03) नवरात्रौत्सवाच्या पाचव्या दिवशी म्हणजेच ललित पंचमी दिवशी गजारूढ अंबाबाई रूपात पूजा बांधण्यात आली. आजच्या दिवशी आई अंबाबाई तिची प्रिय सखी त्र्यंबोली देवीला भेटण्यासाठी जाते. त्या पार्श्वभूमीवर आज अंबाबाईची हत्तीवर अंबारीमध्ये बसलेल्या स्वरूपातील विशेष पूजा बांधण्यात आली.
नवरात्रोत्सवाचा आज पाचवा दिवस श्री अंबाबाईच्या नित्यक्रमातला सगळ्यात वेगळा दिवस म्हणजे ललिता पंचमीचा दिवस. आजच्या दिवशी देवीचा शृंगार दुपारी बाराच्या आधीच होतो. कारण आजच्या दिवशी देवी तिची प्रिय सखी त्र्यंबोली देवीच्या भेटीसाठी निघते. कामाक्ष वध करून करवीरच्या पुर्वेला रूसून बसलेल्या त्र्यंबुली देवीचा रूसवा काढायला लवाजम्यासह देवी निघते.
आजच्या दिवशी कोल्हासुर वधाचे प्रतीक म्हणून त्र्यबोली देवीच्या दारात कोहळ्याचा भेद केला जातो. प्रत्यक्ष देवी महालक्ष्मीच्या वचनानुसार श्री महालक्ष्मी समस्त देव, रूशी, त्यांचे परिवार, श्री त्र्यंबोलीचे दर्शनाकरिता निघालेल्या स्वरूपात आजची पूजा बांधली जाते.