Lalit Modi। भारताच्या तावडीतून सुटण्यासाठी, फरार उद्योगपती ललित मोदीने वानुआतूचे नागरिकत्व मिळवले होते. दरम्यान, ललित मोदींना मोठा धक्का बसला आहे. ललित मोदी यांना देण्यात आलेला वानुआतू पासपोर्ट रद्द करण्याचे निर्देश वानुआतूचे पंतप्रधान जोथम नापट यांनी नागरिकत्व आयोगाला दिले आहेत.
वानुआतूच्या स्थानिक वर्तमानपत्राने त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये यासंबंधी माहिती दिली. अहवालानुसार, ललित मोदीचा वानुआतू पासपोर्ट रद्द करण्यात न्यूझीलंडमधील भारताच्या उच्चायुक्त नीता भूषण यांनी इतर काही बेट देशांसह महत्त्वाची भूमिका बजावत वानुआतू देशाचा मोदींचा पासपोर्ट रद्द केला.
‘या’ कारणामुळे उचलण्यात आले पाऊल Lalit Modi।
वर्तमानपत्राने त्यांच्या सोशल मीडियावर, ‘आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्ये अलिकडच्या काळात झालेल्या खुलाशानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. “बाकीची माहिती उद्याच्या वर्तमानपत्रात देण्यात येणार.’ असे म्हटले आहे. याविषयी वर्तमानपत्राने जास्त माहिती शेअर केलेली नाही. ललित मोदी हा एक फरार भारतीय व्यापारी आहे हे वानुआतुला नंतर कळले, त्यामुळेच हा निर्णय घेण्यात आल्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
७ मार्च रोजी भारतीय पासपोर्ट परत करण्यासाठी केला होता अर्ज Lalit Modi।
ललित मोदी यांनी ७ मार्च रोजी त्यांचा भारतीय पासपोर्ट परत करण्यासाठी अर्ज केला होता आणि नंतर परराष्ट्र मंत्रालयानेही त्याची पुष्टी केली. ललित मोदी २०१० मध्ये भारत सोडून लंडनमध्ये राहत आहेत. याबाबत परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल म्हणाले होते की, ‘त्यांनी लंडनमधील भारतीय उच्चायुक्तालयात आपला पासपोर्ट जमा करण्यासाठी अर्ज केला आहे.’
ते पुढे म्हणाले, ‘याची चौकशी विद्यमान नियमांनुसार केली जाईल. आम्हाला असेही सांगण्यात आले आहे की त्याने वानुआतूचे नागरिकत्व घेतले आहे. आम्ही त्याच्याविरुद्धच्या खटल्याचा कायदेशीरदृष्ट्या पूर्ण पाठपुरावा करत राहू. हे लक्षात घेण्यासारखे आहे की ललित मोदी यांच्यावर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) उपाध्यक्ष असताना फसवणूक, मनी लाँड्रिंग आणि परकीय चलन व्यवस्थापन कायदा 1999 (FEMA) चे उल्लंघन केल्याचा आरोप आहे.