परिंचे, (वार्ताहर) – सरकारची निर्यातबंदी सारखी धोरणे व निसर्गाचा लहरीपणा शेतकर्यांच्या मुळावर उठला आहे. तरीही बळीराजा खचलेला नाही. त्यातच या वर्षी पुरंदर तालुक्यात तीव्र दुष्काळी परिस्थिती, मध्येच उन्हाच्या झळा तीव्र असताना श्रीक्षेत्र वीर (ता.पुरंदर) येथील प्रताप विलास धुमाळ यांची लालबुंद टॉमेटोने शेती बहरली आहे. सध्या त्यांना 10 रुपये प्रति किलोने दर मिळत असून आत्तापर्यंत 7 लाखांचे उत्पन्न मिळाले आहे, अजून 8 ते 10 लाख रुपये उत्पन्न मिळणार असल्याचे प्रताप धुमाळ यांनी सांगितले आहे.
धुमाळ यांनी पीक पद्धतीत सातत्य ठेवले आहे. ते दर वर्षी उन्हाळ्यात टॉमेटोचे पीक घेत आहेत. प्रताप धुमाळ यांनी यंदा दोन एकर क्षेत्रावर टोमॅटो लागवड केली. लागवडीसाठी अथर्व जातीची निवड केली. टोमॅटो लागवड करण्यापूर्वी त्यांनी जमिनीची मशागत करून यामध्ये बेड तयार करून घेतले नत्र स्फुरद पालाश व मायक्रो न्यूट्रन, शेणखताचा वापर करून बेड भरून घेतले ठिबक सिंचन अंथरुन दोन सरीमध्ये साडेचार फुटाचे अंतर ठेवून मल्चिंग पेपर अंथरुन झिकझॅक पद्धतीने 20 हजार रोपांची लागवड केली.
लागवड झाल्यावर ह्युमिक अॅॅसिड, सिलिका, सीवीड एक्सट्रॅक्ट, किटकनाशके व बुरशीनाशकांच्या वेळोवेळी फवारण्या केल्या. रोपांच्या वाढीसाठी वेळोवेळी पाण्यातून विद्राव्य खतांच्या मात्रा दिल्या रस शोषणारी कीड, फूल कीड, पांढरी माशी आदी अळ्या व रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून चिकट व लाइट सापळ्यांचा वापर केला.
1 मे रोजी टॉमेटो पिकाचा पहिला तोडा झाला आत्तापर्यंत चार तोडे झाले असून 70 टन उत्पन्न निघाले आहे. 10 रुपये प्रति किलो प्रमाणे विक्री झाली असून साडेसहा लाख रुपये उत्पन्न मिळाले आहे. टोमॅटो खरेदीसाठी व्यापारी बांधावर येत असून रोख पैसे देऊन खरेदी करतात.
आता बाजारभाव वाढत चालले आहेत अजून 8 ते 10 लाख रुपये उत्पन्न मिळणे अपेक्षित आहे. चार लाख रुपये खर्च वजा जाता 12 लाख रुपये उत्पन्न मिळणार असल्याचे प्रताप धुमाळ यांनी सांगितले आहे. गेल्या वर्षी दिड एकर क्षेत्रावर टोमॅटो शेती केली होती बाजारभाव व वातावरण चांगले असल्याने 20 लाख रुपये उत्पन्न मिळाले होते.
पारंपरिकमध्ये बदल; हंगामावर जोर
पारंपरिक पीक पद्धतीत बदल करून हंगामी भाजीपाला पिकांची लागवड आम्ही करत आहोत. यामध्ये टोमॅटो, स्ट्रॉबेरी, काकडी, ढोबळी मिरची, कलिंगड टरबूज आदी पिके घेत असल्याने लाखो रुपयांचे उत्पन्न मिळत आहे.दिलीप धुमाळ व रवींद्र धुमाळ हे दोन मोठे भाऊ मला शेती करताना मार्गदर्शन करत असल्याचे प्रताप धुमाळ यांनी सांगितले.