fbpx

सॉलॉलक्‍स बॅडमिंटन स्पर्धा : वडिलांना करोनाची बाधा झाल्याने सेनची माघार

बर्लिन – लक्ष्य सेनसह अजय जयराम, शुभंकर डे यांनाही येथे सुरू झालेल्या सॉलॉलक्‍स बॅडमिंटन स्पर्धेतून माघार घ्यावी लागली आहे. सेन याच्या वडिलांना करोनाची बाधा झाल्याचे स्पष्ट झाल्यामुळे या खेळाडूंना स्पर्धा अर्धवट सोडून माघार घेण्याचा निर्णय घ्यावा लागला आहे. 

सेन याचे वडील डी. के. सेन हेच त्याचे प्रशिक्षकही आहेत. या स्पर्धेसाठी जर्मनीला हे सर्व खेळाडू त्यांच्याबरोबरच रवाना झाले होते. आता डी. के. सेन बाधित झाल्यामुळे याची बाधा या खेळाडूंनाही होण्याचा धोका असल्याने त्यांना आता या स्पर्धेत खेळता येणार नसल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे. प्रत्यक्षात लक्ष्यचा करोनाच्या चाचणीचा अहवाल निगेटिव्ह आला असला तरीही आयोजकांनी कोणताही धोका पत्करण्याची तयारी नसल्याचे स्पष्ट केले आहे.

या स्पर्धेत महिला गटात मालविका बनसोडला पराभवाचा धक्का बसला, तर अजय जयरामने पहिल्या फेरीत विजय मिळवला होता. लक्ष्य व डे यांना पहिल्या फेरीत पुढे चाल मिळाली होती. या स्पर्धेसाठी या खेळाडूंना सोपा ड्रॉ मिळालेला असतानाच सेनचे वडील करोनाबाधित असल्याचे सिद्ध झाल्याने या खेळाडूंना स्पर्धेतून माघार घ्यावी लागत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.