शिचीयान – भारताचा स्टार बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन व मालविका बनसोड यांनी कोरियन ओपन बॅडमिंटन स्पर्धेत पहिल्या फेरीचे सामने जिंकत विजयी सलामी दिली. मालविकाने महिला एकेरीत चीनच्या हन यु हिला 20-22, 22-20, 21-10 असे पराभूत केले.
या सामन्यात पहिली गेम गमावल्यानंतरही थाटात पुनरागमन करत मालविकाने नंतरच्या दोन्ही गेममध्ये वर्चस्व राखले व सामना जिंकला. तर, पुरुष एकेरीत ऑल इंग्लंड उपविजेता भारताचा स्टार खेळाडू लक्ष्य सेन याने दक्षिण कोरियाच्या चोई जी हून याला कडवी लढत दिली.
सेनने पहिल्या फेरीच्या या सामन्यात हूनवर 14-21, 21-16, 21-18 असा विजय मिळवला. आता दुसऱ्या फेरीत त्याची लढत इंडोनेशियाच्या शेसर हिरेन रुस्तवितो याच्याशी होणार आहे.