– प्रा. डॉ. अश्विनी महाजन
देशात दर दोन वर्षांनी एकदा अनिवासी भारतीयांचे संमेलन मोठ्या थाटामाटात साजरे केले जाते. यावेळी भुवनेश्वरमध्ये हे संमेलन पार पडले. यंदाचे हे 18 वे संमेलन आहे. हे संमेलन आजच्या काळात महत्त्वाचे आहे.
पहिला अनिवासी भारतीय दिवस 9 जानेवारी 2003 रोजी साजरा करण्यात आला. 2003 ते 2015 या कालावधीत दरवर्षी ही परिषद आयोजित करण्यात आली. पण तेव्हापासून ही परिषद दर दोन वर्षांनी एकदा आयोजित केली जाते. परराष्ट्र मंत्रालयाच्या अंदाजानुसार, नोव्हेंबर 2024 पर्यंत जगातील भारतीय वंशाची आणि अनिवासी भारतीयांची एकूण लोकसंख्या 3.54 कोटी होती. यामध्ये 1.96 कोटी भारतीय वंशाचे आणि 1.58 कोटी अनिवासी भारतीय होते. म्हणजे भारतीय आणि अनिवासी भारतीयांची संख्या इतर कोणत्याही देशाच्या तुलनेत जगात सर्वाधिक आहे. भारतीय वंशाचे लोक युरोप, ब्रिटन, अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि अरबी आखाती देशांमध्ये राहतात.
भारतीय वंशाचे लोक जे स्वातंत्र्यापूर्वी इतर ब्रिटीश वसाहतींमध्ये आणि इतर देशांमध्ये मजूर म्हणून गेले. स्वातंत्र्यानंतर युरोप, अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया किंवा इतर देशांमध्ये गेलेले भारतीय, मग ते भारतीय नागरिकत्व असो किंवा परदेशी नागरिकत्व असो त्या सर्वांचे भारताशी भावनिक नाते आहे. परदेशात जाणारे लोक आजही त्यांच्या कुटुंबियांशी अविभाज्य संबंध ठेवून आहेत. त्यामुळे ते भारतात मोठ्या प्रमाणात पैसे पाठवतात. याचबरोबर स्वातंत्र्यापूर्वी भारत सोडून गेलेल्यांनीही भारताला आपल्या हृदयात जपून ठेवले आहे.
2023च्या जागतिक बँकेच्या आकडेवारीनुसार, अनिवासी भारतीयांनी भारतात एकूण 120 अब्ज डॉलर इतकी रक्कम पाठवली होती. ही रक्कम 2024 मध्ये 124 अब्ज डॉलर आणि 2025 मध्ये 129 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. सन 2023-24 मध्ये, विदेशी थेट गुंतवणूक आणि पोर्टङ्गोलिओ गुंतवणूक ही दोन्ही मिळून केवळ 54 अब्ज डॉलर्स एवढी होती. म्हणजेच एकूण विदेशी गुंतवणुकीच्या दुपटीहून अधिक रक्कम अनिवासी भारतीयांनी पाठवली आहे.
भारताच्या परकीय चलनाच्या गरजा मोठ्या प्रमाणावर अनिवासी भारतीयांद्वारे पूर्ण केल्या जातात. परकीय भांडवलाचा आत्तापर्यंतचा अनुभव असा आहे की, नवीन उत्पादन क्षेत्रात ती ङ्गारच कमी येते. बहुतेक परदेशी गुंतवणूकदार प्रस्थापित भारतीय कंपन्या विकत घेत आहेत. ते क्वचितच त्यांच्या भांडवलाने तंत्रज्ञान आणतात हेही खरे आहे. विदेशी पोर्टङ्गोलिओ गुंतवणुकीपेक्षा थेट परकीय गुंतवणूक चांगली मानली गेली आहे. कारण ही विदेशी गुंतवणूक तुलनेने अधिक स्थिर असते. परंतु थेट परकीय गुंतवणुकीचा परिणाम म्हणून भारतातून उत्पन्नाचे हस्तांतरण मोठ्या प्रमाणात वाढले.
आज परिस्थिती अशी आहे की, लाभांश, रॉयल्टी, तांत्रिक शुल्क, पगार इत्यादी स्वरुपात मिळणार्या थेट परकीय गुंतवणुकीपेक्षा जास्त परकीय चलन उत्पन्न हस्तांतरणाच्या नावाखाली निघून जाते आणि देशाचे परकीय दायित्व वाढतच जाते. याउलट अनिवासी भारतीयांनी पाठवलेला पैसा विश्वासार्ह तर असतोच तसेच यामुळे परकीय दायित्वही वाढत नाही आणि ते देशाचे साधन बनते. ओव्हरसीज इंडियन कॉन्ङ्गरन्स हे भारत सरकारला परदेशातील भारतीयांशी जोडण्यासाठी, त्यांच्या चिंता समजून घेण्यासाठी आणि भारताच्या विकासात सहभागी होण्यासाठी एक व्यासपीठ म्हणून काम करत आहे. याद्वारे अनिवासी भारतीयांना भारतात गुंतवणूक करण्यास, भागीदारी करण्यासाठी आणि देशाच्या विकासात योगदान देण्यासाठी प्रोत्साहित केले जाते.
या निमित्ताने भारतातील गुंतवणुकीच्या संधी समोर आणल्या जातात. एकीकडे व्यवसायाशी निगडित लोक अनिवासी भारतीयांशी बोलून व्यवसाय वाढवण्याचे काम करतात, तर सरकारही व्यवसायाशी संबंधित अनिवासी भारतीयांशी बोलते. त्यामुळे देशातील गुंतवणूक आणि विकासाला गती मिळते. ओव्हरसीज इंडियन कॉन्ङ्गरन्स भारतीय डायस्पोरा लोकसंख्या असलेल्या देशांमधील व्यापाराला प्रोत्साहन देते. सांस्कृतिक देवाणघेवाणीतही ती महत्त्वाची भूमिका बजावते. सांस्कृतिक वारसा साजरा करण्याची ही वेळ आहे. ही परिषद भारत आणि इंडियन डायस्पोरा यांच्यातील संपर्क आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीला चालना देते. एवढेच नाही तर परदेशातील भारतीय समुदायांमध्ये भारतीय संस्कृती, परंपरा आणि मूल्ये यांची जपणूक करण्यास यामुळे मदत होते.
ही परिषद व्यवसाय, विज्ञान, कला आणि परोपकार यासारख्या क्षेत्रात परदेशातील भारतीयांच्या अतुलनीय योगदानाची दखल घेते. ‘विकसित भारतासाठी परदेशी भारतीयांचे योगदान’ ही यावर्षीच्या परिषदेची संकल्पना. यावर्षी 27 अनिवासी भारतीयांना हा सन्मान देण्यात आला. अनिवासी भारतीयांना भारत सरकारने दिलेला हा सर्वोच्च सन्मान आहे. उच्च शिक्षण घेतल्यानंतर भारतीय तरुण परदेशात जातात, त्यामुळे देशाच्या विकासात योगदान देऊ शकत नाहीत, अशी चिंता अनेकदा व्यक्त केली जाते. याला ‘ब्रेन ड्रेन’ची समस्या म्हणून ओळखले जाते. आपल्या उच्च शिक्षित लोकांनी भारताच्या विकासात हातभार लावला तर देशाचा विकास होण्यास मदत होऊ शकते. अनिवासी भारतीय संमेलन ही भारतातील सध्याच्या काळात उदयास येत असलेल्या संधी आणि देशाच्या विकासाचे प्रदर्शन करण्याची एक संधी आहे.