पद्मश्री पोपेरे यांना लक्ष्मीबाई जीवनगौरव पुरस्कार जाहीर

 अकोले -कोंभाळणे (ता अकोले) येथील बीजमाता राहीबाई पोपेरे यांना सर्वोच्च पद्मश्री पुरस्कार हा मानाचा पुरस्कार मिळाल्यानंतर ‘लक्ष्मीबाई जीवनगौरव पुरस्कार’ जाहीर झाला. रयत शिक्षण संस्थेकडून दिल्या जाणाऱ्या या पुरस्काराची घोषणा संस्थेचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली.

कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या जयंतीनिमित्त 22 सप्टेंबर रोजी घेण्यात आलेल्या व्हर्च्युअल बैठकीमध्ये या पुरस्काराची घोषणा त्यांनी केली.राज्यामध्ये शैक्षणिक क्षेत्रात भरीव कार्य करणाऱ्या आणि ज्ञानगंगा दारोदारी पोहचवणाऱ्या रयत शिक्षण संस्थेतर्फे दिला जाणारा देशपातळीवरील मानाचा लक्ष्मीबाई भाऊराव पाटील जीवनगौरव पुरस्कार यंदा बीज माता पद्मश्री राहीबाई सोमा पोपेरे यांना जाहीर झाल्याने अकोले तालुक्‍यातील आनंदाचे भरते आले आहे.

कोंभाळणे या त्यांच्या गावी फटाके फोडून या पुरस्काराचे स्वागत करण्यात आले. पोपेरे यांच्या घरी दीड महिना अगोदर दिवाळी साजरी करण्यात आली. अडीच लाख रुपये रोख, सन्मानचिन्ह व मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त विशेष कार्यक्रमात येत्या 9 मे रोजी या पुरस्काराचे वितरण होणार आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.